गोंदिया : डायमंड एक्सचेंज गेमींग अप्लीकेशनच्या मार्फत लोकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा सट्टाकिंग सोंटू (अनंत) नवतरन जैन याने आपल्या तिजोरीतील रक्कम आपल्या मित्र मंडळी व ओळखीच्या लोकांकडे सोडल्याने सोंटूचा मित्र डाॅ.गौरव राजेंद्र बग्गा व एक्सीस बँकेचे व्यवस्थापक अंकुश खंडेलवार यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेने छापा घालून पाच थैली रोकड व सोन्याची बिस्किटे ताब्यात घेतली. रामदेवबाबा काॅलनीतील अंकुश खंडेलवाल यांच्या घरी पथकाला काहीच न मिळाल्याने त्यांना एक्सीस बँकेत नेऊन तिथे चौकशी सुरु केली आहे.
डॉ. गौरव बग्गा यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेने छापे घालून एक कोटी ३४ लाख रूपये रोख व ३ किलो २०० ग्रॅम सोने जप्त केले आहे.या प्रकरणात डॉ.गौरव बग्गा यांना ताब्यात घेऊन नागपूरला एक वाहन रवाना झाले.नागपूर आर्थीक गुन्हे शाखेच्या आठ अधिकारी,कर्मचाऱ्यांनी आज (दि.२०) ही कारवाई सकाळी ८ वाजतापासून सुरू केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने पाच पिशवीत पैसे व सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत.डाॅ.गौरव बग्गा हे शासकीय गंंगाबाई महिला रुग्णालयात रेडोआलाॅजिस्ट वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सोंटू जैन ने नागपुरातील व्यापाऱ्याला ५८ कोटींचा गंडा घातला. व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच सोंटू दुबईला पसार झाला. २२ जुलैला पोलिसांनी सोंटूच्या गोंदियातील निवासस्थानी छापा टाकून १७ कोटींची रोख, १४ किलो सोने व २९४ किलो चांदी जप्त केली होती.