वाघाच्या शिकारप्रकरणी मरेगाव-मोहटोल्यातील सहा आरोपींना अटक

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गडचिरोली : चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत अमिर्झाच्या जंगलात करंट सोडून झालेल्या वाघाच्या शिकारीतील सहा आरोपींना हुडकून काढण्यात वनविभागाला यश आले. यातील पाच जण मरेगाव टोली येथील रहिवासी असून एक जण मोहटोला येथील रहिवासी आहे. त्यांनी गायब केलेले वाघाचे अवयव आणि त्यासाठी वापरलेले धारदार शस्रही जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या शिकारीतील आरोपी स्थानिक पातळीवरचेच असण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी बुधवारी ‘कटाक्ष’सोबत बोलताना वर्तविली होती. ती तंतोतंत बरोबर निघाली.

अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रमोद मनोहर मडावी (२९ वर्ष), सुनील केशव उसेंडी (२८ वर्ष), दिलीप रुषी उसेंडी (२८ वर्ष), प्रकाश दयाराम हलामी (४२ वर्ष), चेतन सुधाकर अलाम (२५ वर्ष) सर्व रा.मरेगाव टोली, आणि निलेश्वर शिवराम होळी (रा.मोहटोला, ता.गडचिरोली) यांचा समावेश आहे.

त्यांच्याकडून मृत वाघाच्या पायाचे पंजे, नखे, दात आणि शिकारीसाठी वापरलेली कुऱ्हाड, सुरा हे शस्र जप्त करण्यात आले. या सर्व आरोपींवर वनगुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाची चौकशी उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनात चौकशी अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक (जंकास) संकेत वाठोरे करीत आहेत.