यवतमाळच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा

0
132

; विनावेतन सहायक शिक्षकाकडून नियुक्तीसाठी २० लाख रुपये घेतल्याची तक्रार

यवतमाळ: एका अनुदानित खासगी शाळेवर विनावेतन सहायक शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यासाठी २० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ येथील तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह संस्था चालकांविरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे शिक्षणाधिकारी सध्या पुणे येथे शिक्षण संचालनालयातील अंदाज व नियोजन विभागाचे उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

कळंब तालुक्यातील मेंढला येथील एकता बहुद्देशीय संस्थेद्वारा संचालित शाळेवर विनावेतन सहायक शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी २० लाखांची बोलणी ठरली. त्यात यवतमाळचे तत्कालीन शिक्षणाधिकारी व सध्या पुणे येथे उपसंचालक असलेले दीपक चवणे यांच्यासह पाच जणांनी फसवणूक केल्याविरोधात संबंधित शिक्षकाने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून बुधवारी ग्रामीण पोलीस ठाण्यात उपसंचालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. सलीम जाहीद खान (रा. मिटनापूर, ता. बाभूळगाव) असे फसवणूक झालेल्या तक्रारदार शिक्षकाचे नाव आहे.सलीम खान यांना विनावेतन सहायक शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी पैशाची मागणी करण्यात आली. ‘बॅकडेट’मध्ये २०१५ पासूनचा नियुक्ती आदेश देण्याकरिता २० लाख रुपये मागण्यात आले. या व्यवहारानंतर मेंढला येथील एकता बहुद्देशीय संस्थेद्वारा संचालित शाळेवर नियुक्ती देण्याचे ठरले. व्यवहार झाल्याप्रमाणे शिक्षण उपसंचालक दीपक चवणे, संस्थेचे संस्थापक दिलीप माणिकराव वासेकर, संचालक मंडळातील सदस्य सुजाता दिलीप वासेकर, राजेंद्र केशवराव कांबळे, भगवान केंगार, विनायक वासेकर यांनी मिळून फसवणूक केल्याची तक्रार सलीम खान यांनी दिली.

या प्रकरणाचा अधिक तपास यवतमाळ ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रेमसिंग चव्हाण करीत आहेत. यवतमाळचे तत्कालीन शिक्षणाधिकारी व विद्यमान शिक्षण उपसंचालक ‘बॅकडेट’ आदेश देण्यासाठी शिक्षण विभागात विशेष प्रसिद्ध असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे. त्यांच्या कार्यकाळातील नियुक्तीसह विविध आदेशांची चौकशी झाल्यास मोठा शैक्षणिक घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे. या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद दाखवत होता.