गोंदिया : पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उपविभाग देवरी अंतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांचे नियंत्रण व मार्गदर्शनाखाली विशेष पथक गठीत करण्यात आले असुन पथकाद्वारे जिल्ह्यातील देवरी उपविभागातील अवैध धंद्यांवर धाड कारवाई करण्यात येत आहे.
या अनुषंगाने वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक – 28/12/2023 रोजी पोलीस ठाणे नवेगावबांध परिसरात पेट्रोलिंग दरम्यान धाड कारवाई केली असतांना धाबेपवनी चौकात एक आयसर ट्रक संशयीतरित्या दिसून आल्याने त्यास पोलीस पथकाने थांबवुन आयसर ट्रक चालक नामे – ओमप्रकाश देवाजी शिंदे यास ट्रकमध्ये असलेल्या मालाबाबत विचारपूस शहानिशा केली असता त्यांनी उडवा-उडविचे उत्तर दिल्याने सदरचा आयसर ट्रक पो. स्टे. नवेगावबांध येथे आणुन पाहणी केली असता ट्रक मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला पान मसाला/ सुगंधित तंबाखु /इगल/मजा असा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करतांना मिळुन आल्याने सदर संबंधात तात्काळ अन्न व औषध प्रशासनास माहिती देवुन अन्न-औषध सुरक्षा अधिकारी यांना पाचारण करुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला पान मसाला/सुगंधित तंबाखु /इगल/मजा/ट्रकसह असा एकुण 40 लाख 20 हजार 120/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ट्रक चालक नामे- ओमप्रकाश देवाजी शिंदे वय 35 वर्षे रा. काटोल रोड पेटरी ता.जि. नागपुर याचेविरुध अन्नसुरक्षा व मानदे कायदा, आणि भादंवि कायद्यान्वये पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे अप.क्र.112/2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची दर्जेदार धाड कारवाई मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांचे नियंत्रणात व मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अधिकारी – अंमलदार तसेच अन्न सुरक्षा प्रशासन अधिकारी कर्मचारी यांनी केलेली आहे.