चार कुख्यात आरोपींवर लावला मकोका, पोलिसांनी केली कारवाई

0
10

गोंदिया : खंडणीसह अन्य कित्येक प्रकारचे गुन्हे पोलिसांत दाखल असलेल्या चौघा आरोपींवर पोलिसांनी मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा सन- 1999) अंतर्गत कारवाई केली आहे. या चौघांवर खंडणीसह अन्य कित्येक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील तिघांना अटक करण्यात आली असून चौथा फरार आहे. पोलिस उपमहानिरीक्षकांनी शुक्रवारी (दि.5) याबाबत आदेश दिले होते. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत एका प्रकरणात आरोपी शाहरुख फरीद खान पठाण (29, रा. गड्डाटोली), दुर्गेश ऊर्फ डॅनी रमेश खरे (31, रा. बसंतनगर), आदर्श ऊर्फ बाबूलाल भगत (20, रा. बापट चाळ) व संकेत अजय बोरकर (20, रा. कन्हारटोली) यांनी फिर्यादीस खंडणी मागितल्यास रामनगर पोलिसांत भादंवि कलम 386, 34 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करताना आरोपीतांनी संघटितरीत्या टोळी निर्माण करून जनसामान्यांच्या मनात भय व हिंसेचे वातावरण निर्माण केले. त्यांचा अंतिम हेतू स्वतःकरिता आर्थिक फायदा मिळविणे हाच असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीतांच्या गुन्हेगारी वृत्तीची सखोल माहिती घेऊन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस निरीक्षक रामनगर यांना या संघटित टोळीविरुद्ध मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार, रामनगर व स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकांनी चारही आरोपींविरुद्ध मकोका कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी पोलिस उपमहानिरीक्षकांकडे 20 डिसेंबर 2023 रोजी मंजुरीस्तव सादर केला होता. त्याला पोलिस उपमहानिरीक्षकांनी शुक्रवारी (दि. 5) मंजुरी देत आरोपींवर मकोका कायद्यांतर्गत कलमवाढ करून पुढील तपास करण्याचे आदेश पारीत केले आहे. ही मकोका कारवाई स्थागुशा निरीक्षक दिनेश लबडे, पोनि. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनात सपोनि राजू बस्तावडे, पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, हवालदार चेतन पटले, प्रकाश गायधने, स्थागुशा आणि सहायक फौजदार राजू भगत, हवालदार जनबंधू यांनी पार पाडली आहे.