वाळूमाफियांचा रामटेकच्या महिला एसडीओंवर हल्ला,तीन वाळू तस्करांना अटक

0
22

नागपूर,दि.15ः– वाळूमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. या मुजोर वाळूमाफियांना वेसण घालण्यास गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला चढविण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यात विनारॉयल्टी वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी गेलेल्या रामटेकच्या महिला उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या वाहनावर वाळूमाफियांनी हल्ला करीत अपघात घडविण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी तीन मुजोर तस्करांना अटक करण्यात आली आहे.

तुमसरहून रामटेकच्या दिशेने वाळूचे 25 ते 30 ट्रक येत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती.त्यानंतर उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी दोन पथके तयार करून ट्रक पकडण्यासाठी या मार्गावर मोर्चेबांधणी केली. त्यांना MH40/LT 8896, MH34/BG 4414, MH40-/CM8 788, MH34/BH 4748, MH40/CM 0184, MH40/BF 5521 आणि MH40/AK 7989 क्रमांकांच्या सात वाहनांमध्ये दहा ब्रास वाळू आढळून आली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सर्व टिपर लगेच ताब्यात घेत रामटेक तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले. या धावपळीत MH40/AK 6546 क्रमांकाचा टिपर घोटीटोक येथून भंडारा मार्गानी पळून जात असताना वंदना सवरंगपते यांनी त्याचा पाठलाग सुरू केला.

टिपरमधील एकाने त्यांना हातोडा दाखवून घाबरविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी MH49/B 6616 क्रमांकाची नॅनो कार दोन्ही वाहनांच्यामध्ये आली. नॅनो कारमुळे वंदना सवरंगपते यांना पुढे जाता येत नव्हते. त्यांच्या वाहनाला अपघात व्हावा, म्हणून समोर असलेल्या टिपरमधील वाळू रोडवर टाकली. रोडवर वाळू पसरताच नॅनोसह टिपर पळून गेला. सुदैवाने अधिकारी थोडक्यात बचावल्या.

एसडीओंनी विनारॉयल्टी वाळू वाहतुकीचे सात ट्रक जप्त केले. वंदना सवरंगपते यांच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला. या घटनेला नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गांभीर्याने घेतले. त्यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला कामाला लावले. पोलिसांनी रात्री उशिरा तीन आरोपींना अटक केली.

टिपरचालक जोगेश्वर हरिदास यादव (वय 35, रा. पारडी, नागपूर), कारचालक मोनू कादर खान (वय 34) व विष्णू चंद्रप्रकाश मिश्रा (वय 33, दोघेही रा. खरबी, नागपूर) या तिघांना नागपुरातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून नॅनो कार व टिपर जप्त करण्यात आला आहे.

वाळू घाट बंद असल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच तस्कर चढ्या दराने वाळूची विक्री करीत आहेत. गेल्या महिन्यापासून भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वाळू आणली जात आहे. ती रामटेकमार्गे नागपूर व अमरावतीला नेली जाते. त्यामुळे अशाच अवैध मार्गाने वाळू तस्करी करत असताना वाळूमाफिया आणि महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा आमना-सामना होताना पाहायला मिळत आहे.