कल्याण: भाजप आमदार (BJP) गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आलाय. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाला आहे.शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे. महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आता समोर आला आहे. गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती मिळत आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळीबार केला आहे. गोळीबारांचं एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागला आहे. आरोपी गणपत गायकवाड यांना व्हीसीद्वारे कोर्टात हजर करणार आहे.
गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड देखील आरोपी आहे. पोलीस त्याचा देखील शोध घेत आहेत
>सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतं आहे?
हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यासह इतरांसोबत होते. या दोन्ही गटात आधी बसून सुरू असलेल्या चर्चेत अचानक वातावरण तापलं आणि आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पिस्तुल काढून गोळीबाराला सुरूवात केली. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना या गोळीबारात गोळ्या लागल्या. गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर तातडीने एका पोलिसाने आत धाव घेतली. मात्र तोवर आमदार गायकवाड हे महेश गायकवाडला मारहाण करत होते. त्यांना रोखण्याचा पोलीस कर्मचाऱ्याने प्रयत्न केला. त्याचवेळी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनीही आत धाव घेतली. दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांशी तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांवर खुर्च्या उचलून कार्यकर्त्यांची हाणामारी झाली.
>महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक
उल्हासनगर गोळीबारातील जखमी दोघांपैकी महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तर त्यांचा सहकारी राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. श्रीकांत शिंदे भेटल्या नंतर महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची माहिती दिली . महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर आहे. महेश गायकवाड यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सहा गोळ्या शरीरातून बाहेर काढल्या परंतु जखम गंभीर आहे. तर राहुल पाटील रूग्ण यांच्यावर रात्री तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सध्या अतिदक्षता विभागात आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घटनेचा पक्षाशी काही एक संबंध नाही : नरेश म्हस्के
दरम्यान ही सगळी घटना वैयक्तिक वादातून झाली असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी दिली आहे. राजकीय वाद या स्तरावर येणं योग्य नाही. या घटनेचा पक्षाशी काही एक संबंध नाही. वैयक्तिक वादातून सगळा प्रकार झल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.