पुणे – ‘निर्भय बनो’ सभेला जाणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गटाच्या 10 कार्यकत्यांना शनिवारी सायंकाळी पुणे पोलिसांनी अटक केली. भाजपचे माजी नगरसेवक दिपक पोटे, गणेश घोष, गणेश शेरला, बापु मानकर, स्वप्नील नाईक, प्रतीक देसरडा, दुशांत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) गट दत्ता सागरे, गिरीश मानकर आणि राहुल पायगुडे, अशी अटक करण्यात आलेल्याची नाव आहे. याबाबत श्रद्धा वसंत जाधव (वय 21, रा. मुंढवा) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राष्ट्र सेवा दल, निळू फुले सभागृह, सिंहगड रोड येथे निर्भय बनो या कार्यक्रमासाठी आलेल्या जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवरती भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गट या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हल्ला केला होता. शाई, अंडी फेकण्याबरोच दगडाने गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या.
खंडोजी बाबा चौक, अलका टाकी चौक, लाल बहाद्दुर शास्त्री रोड, दांडेकर पूल ते कार्यक्रमस्थही पोहचेपर्यंत वागळे यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी शनिवारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 जणांना अटक केली आहे. पुढील तपासामध्ये आणखी आरोपी निष्पन्न झाले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.