शाळेतील शिक्षिकांकडून मारहाण अन् विद्यार्थ्याने संपवले जीवन

0
9

अकोला : शहरातील नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला. शिक्षिकांकडून मारहाण आणि मानसिक जाचाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.शहरातील खदान परिसरातील रहिवासी अल्तमेश हा एका विद्यालयात नववीमध्ये शिक्षण घेत होता. काल शाळेत झालेल्या किरकोळ कारणांवरून अल्तमेशला शाळेतील शिक्षिकांनी बेदम मारहाण केली. त्याला शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली, असा आरोप पालकांनी केला.

घडलेल्या प्रकार अल्तमेशने घरी आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर सायंकाळी राहत्या घरातील वरच्या खोलीमध्ये तो अभ्यासासाठी गेला. रात्री बराच वेळ तो खाली न आल्याने आई त्याच्याकडे गेली. त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. खदान पोलिसांनी आत्महत्या प्रकरणाची नोंद केली आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्या जाणार असल्याचे खदान पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.