बंद ट्रकचा अंदाज न आल्याने भीषण अपघात…. बापलेक जागीच ठार

0
5

वाशीम : संभाजीनगर – नागपूर महामार्गावर किन्हीराजा गावाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील बाप, लेक जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना २२ मार्च रोजी रात्री उशिरा घडली.

यामध्ये नवलचंद धर्माजी वाघमारे ५५ वर्ष व आशीष नवलचंद वाघमारे ३३वर्ष, हे दोघेही जागीच ठार झाले. ते वर्धा जिल्ह्यातील आहेत. दादाराव निकम हे गंभीर जखमी झाले. किन्हीराजा येथील शिवाजी शाळेजवळ एम. एच. ०४ एफ. यु. ९९८३ हा ट्रक बिघाड झाल्यामुळे रस्त्यावर उभा होता. एम. एच. २० बी. ई. २३४४ या मोटार सायकलने तीन जण संभाजीनगर वरून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील कानगावकडे निघाले होते.ट्रक एकाच जागेवर उभा आहे की चालत आहे, याचा अंदाज दुचाकी चालकाला न आल्याने ते उभ्या ट्रकवर धडकले. या अपघातात दुचाकीवरील नवलचंद वाघमारे व आशीष वाघमारे जागीच ठार झाले तर याच दुचाकीवरील दादाराव निकम हे गंभीर जखमी झाले. जऊळका पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी किन्हीराजा प्रा. आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेने अपघातग्रस्तांना तातडीने वाशीम येथील रुग्णालयात दाखल केले.