बेपत्ता भावंडांचे मृतदेह डोहात आढळले

0
9
वाढदिवसाच्या शुभेच्छा

यवतमाळ : येथील आर्णी रस्त्यावरील बाह्यवळण मार्गावर रेल्वेपुलाखाली असलेल्या एका डोहात दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना शनिवारी रात्री उजेडात आली. अरमान खान शहीद खान (१३) व झियान खान शहीद खान (११) रा. शांतीनगर, वडगाव यवतमाळ अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे सख्खे भाऊ असून गुरूवारपासून बेपत्ता होते. ही दोन्ही अल्पवयीन भावंडे गुरूवारपासून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी दोघांचाही सर्वत्र शोध घेतला. मात्र ते कुठेही आढळून आले नाही.

अखेर मुलांच्या आईने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन्ही मुलांचा शोध सुरू केला. अशात शनिवारी सायंकाळी आर्णी मार्गावरील एलिमेंट मॉलच्या बाजूला असलेल्या रेल्वे पुलाखालील डोहात या दोन्ही भावंडांचे मृतदेह तरंगताना नागरिकांना आढळून आले. माहिती मिळताच अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेश रणधीर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्या दोन्ही भावंडाचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणी करता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. गुरूवारी ही मुले कचरा वेचण्यासाठी घराबाहेर पडल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर ती घरी परतली नव्हती. मुलांचे आई-वडीलही रोजमजुरी करतात. या मुलांचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. अधिक तपास अवधुतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. होळीच्या पूर्वसंध्येला उजेडात आलेल्या या घटनेने शांतीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.