4.40 लाखांची हातभट्टीची दारु व साहित्य नष्ट

0
4

गोंदिया. स्थानीय गुन्हे शाखा पथकाने 6 एप्रिल रोजी तिरोडा तालुक्यातील सिल्ली शिवारात अवैधरित्या सुरु असलेल्या हातभट्टीवर धाड टाकून 4 लाख 40 हजार 900 रुपयांची दारु व साहित्य नष्ट केले. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अवैधरित्या दारु निर्मिती व वाहतुकीविरोधात जिल्हा पोलिस विभागाद्वारे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यातंर्गत सिल्ली परिसरात अवैधरित्या दारु गाळणारी हातभट्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अशोक रहांगडाले यांच्या शेतात असलेल्या हातपट्टीवर धाड टाकून 3 गॅस सिलेंडर, 3 शेगड्या, 3 लोखंडी ड्रम, दारु गाळण्याचे साहित्य जप्त केले. तसेच 90 लीटर मोहफुलाची दारु, 3880 किलो मोहफूल सडवा, एमएच 35, एव्ही 9118 क्रमांकाची दुचाकी असा 4 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन मोहफुल दारु व सडवा नष्ट केला. याप्रकरणी योगेश्‍वर चैतराम नेवारे (45 रा. बोरी) रामपुरी भागवत गंगधरीया (36, रा. सिल्ली) दिगंबर आसाराम भलावी (60, रा. सिल्ली) व भट्टीचालक संजय सोविंदा बरईकर रा. सिल्ली यांच्यावर तिरोडा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.