यवतमाळ : दारव्हा शहरानजीक आर्णी तहसीलदारांच्या मालकीच्या भरधाव कारने दुचाकीस मागाहून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास दारव्हा शहरानजीक घडली. अंकुश देवराव भजने (२५, रा. रामगाव रामेश्वर) व श्रीकांत प्रमोद ठाकरे (२४, रा. तोरनाळा) ता. दारव्हा अशी मृतांची नावे आहे.
अंकुश व श्रीकांत हे मध्यरात्री बोरी अरब येथून मोटरसायकलने (क्र. एमएच २९, एबी ३७०८) दारव्हाकडे जात होते. दारव्हा शहरानजीक भरधाव कारने (क्र. एमएच २९, बीव्ही ४१३७) दुचाकीस मागाहून जोरदार धडक दिली. या अपघातात अंकुश भजने याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. श्रीकांत ठाकरे यास गंभीर अवस्थेत दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच दारव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील कार आर्णी येथील तहसीलदार परसराम भोसले यांच्या मालकीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करत आहेत.