तहसीलदार किसन भदाणेला ७ वर्षात दुसऱ्यांदा लाच प्रकरणात अटक

0
9

गोंदिया,दि.०८- जिल्ह्यातील गोरेगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार किसन भदाणे यांच्याकरीता लाच हा विषय गौण असून लाच मागण्यात व स्विकारण्यात भदाणे यांनी पुर्वीपासूनच नावलौकीक मिळविले आहे.यापुर्वी २०१७ मध्ये सुध्दा ठाणे तहसीलदार पदावर कार्यरत असतांना सुमारे १० लााख रुपयाची लाच स्विकारल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.त्यामुळे गोरेगाव येथील वाळू व्यवसायीकाकडून १ लाख रुपयाच्या लाचेची मागणी करणे हे भदाणे यांच्यादृष्टीने गौण रक्कमच म्हणण्याची वेेळ आली आहे.

सविस्तर असे की,ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील एका जमीन मालकाकडून दहा लाख रुपयांची लाच घेताना ठाण्याचे तहसीलदार आणि त्यांच्या एका साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १८ आॅक्टोंबर २०१७ रोजी रंगेहाथ पकडले होते. मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील काशी गाव येथील सव्‍‌र्हे क्र. ५६, ५९ हिस्सा क्र. ३, ४, ६ या भूखंडाच्या मालकाने  सदर भूखंड एन. ए. (अकृषिक) दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता.हा दाखला मिळण्यासाठी ठाणे येथे तहसीलदार पदावर कार्यरत असतांना किसन भदाणे यांनी खासगी व्यक्तीमार्फत जमीन मालकाकडे दहा लाख रुपयांची मागणी केली होती.त्याप्रकरणात भदाणे यांना दहा लाख रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर पुन्हा ७ वर्षांनी एकदा भदाणे यांनी गोरेगाव येथे तहसीलदार पदावर कार्यरत असतांना  वाळू व्यवसायीकास टिप्पर सोडण्यासाठी व या पुढे वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी प्रती वाहन ५० हजार या प्रमाणे दोन्ही वाहनांचे रू १ लाख रुपये द्यावे लागतील असा निरोप खासगी व्यक्ती मार्फेत दिला होता,त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.विशेष म्हणजे ११ मार्च रोजी करण्यात आलेल्या तक्रारीवर ११,१२,१३ व १४ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली होती.याप्रकरणात १ लाख रुपयांची लाचेची मागणी तहसील कार्यालय गोरेगाव येथे करण्यात आल्याचे सिद्ध झाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ३ आरोपींना दि. ०७ मे रोजी रात्री ताब्यात घेऊन कारवाई केली.