‘बंटी-बबली’ने केली तब्बल साडेपाच कोटींनी फसवणूक

0
17

नागपूर : कंपनीत गुंतवणूक केल्यास दामदुप्पट रक्कम परत करण्याच्या आमिषाला पुन्हा शेकडो नागपूर बळी पडले. एका बंटी-बबलीने शेकडो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा करीत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणासह त्याच्या पत्नी व दोन बहिणींविरुद्ध गुन्हा दाखल केला. एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला आहे. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे.
वासुदेव सखाराम राऊत असे तक्रारदाराचे नाव आहे. २०२१ साली ते सेवानिवृत्त झाले व एका परिचिताच्या सांगण्यावरून त्यांनी त्रिमूर्तीनगरातील नीलेश उईके (४०) व त्याची पत्नी प्रियांका उईके (३६) यांची भेट घेतली. आरोपीने त्याची कॅप्टी इन्व्हेस्टमेंट कंपनी असून आमच्याकडून शेअर बाजारात पैसे लावण्यात येतात. गुंतवणूक करणाऱ्यांना नियमितपणे नफा दिला जातो असा दावा त्यांनी केला. त्यांच्या कंपनीत नीलेशच्या बहिणी नेहा रोशन मेश्राम (३५, कॉसमॉस टाऊन, त्रिमूर्तीनगर) व रश्मी उईके-गोडे (४२, हैदराबाद) यादेखील भागीदार असल्याची त्यांनी माहिती दिली.
राऊत यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फेब्रुवारी २०२३ पर्यंत २० लाख रुपये गुंतविले व त्यावर त्यांना ९.६४ लाख नफा मिळाल्याचे आरोपींनी सांगितले. गुंतवणूक करत असताना आरोपींनी प्रियांका हिच्या नावाचा २० लाखांचे धनादेश राऊत यांना दिला होता. ज्यावेळी राऊत यांनी आरोपींना रक्कम परत मागितली तेव्हा ते टाळाटाळ करू लागले. त्यामुळे त्यांनी तो २० लाखांचा धनादेश बँकेत टाकला. मात्र तो वटलाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी चौकशी सुरू केली. तेव्हा आणखी २९ जणांकडून आरोपींनी पैसे घेऊन गंडा घातल्याची बाब समोर आली. राऊत यांनी राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व पोलिसांनी चारही आरोपींविरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.