घरफोडीच्या गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल मालकाला परत

0
8

गोंदिया,दि.११– न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल शहर पोलिसांनी 9 मे रोजी वरिष्ठांच्या उपस्थितीत सुपूर्दनाम्यावर मूळ मालकाला परत केला.

शहरातील सिव्हिल लाईन येथील जाफर कुंडरेवाला हे सहकुटूंब 10 मार्च रोजी नागपूर येथे गेले असता अज्ञात आरोपीने घरफोडी करुन सोन्याचांदीचे दागिने, मोबाईल टॅब व 24 हजार रोख असा 15 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम व पोलीस अंमलदारांनी गुन्हयाचा तपास बुध्दीकौशल्याने अतिशय शास्त्रोक्त पध्दतीने करुन मिळालेल्या माहितीच्या आधारे अट्टल आरोपी साहिल उर्फ माट्या राजू आंबेकर (24, चंद्रपूर) याला अटक केली. त्यांच्याजवळून चोरी केलेले 15 लाख 45 हजार रुपये सोन्याचांदीचे दागिने जप्त केले. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी 9 मे रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीनी बानकर, पोलिस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत सुपुर्दनाम्यावर दागिन्याचे मूळ मालक जाफर कंडुरेवाला यांना परत केले.