देवरी –तालुक्यातील कारूटोला/पुराडा येथील वाघनदी पात्रात नौकाविहाराच्या उद्देशाने नाव चालविण्याच्या नाद जडलेल्या युवकाला नाव उलटल्याने खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना १४ मेच्या दुपारी २.३० वाजता सुमारासची आहे. अमित सुखलाल सलामे (१७) रा.टेकाबेदर ता.देवरी असे मृताचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील पिंडकेपार ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या टेकाबेदर येथील अमित सलामे (१७) हा लग्न समारंभात (wedding ceremony) सहभागी होण्यासाठी कारूटोला/पुराडा या गावी आला होता. लग्न सोहळा आटोपल्यानंतर चार ते पाच जणांसोबत १४ मे रोजी दुपारी २.०० ते २.३० वाजता सुमारास वाघनदी पात्रात आंघोळीसाठी गेला होता. दरम्यान कारूटोला घाट येथे असलेल्या नौका पाहून नौकाविहाराचा आनंद लुटण्याचे अमित याने ठरविले. आणि पाण्यात नाव चालविण्यासाठी तो नदीपात्रात उतरला. नाव चालवित असताना तोल गेल्याने नाव खोल पाण्यात उलटली. आणि अमित सलामे याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावकर्यांसह सालेकसा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्थानिक मासेमारी करणार्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. परंतु, पाणी जास्त असल्याने बचावकार्यात अडथळा आला. सायंकाळी ७.३० वाजता अमितचा मृतदेह(dead body) हाती लागला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून उत्तरीय तपासणीसाठी देवरी ग्रामीण रूग्णालयात पाठविले. या घटनेची नोंद सालेकसा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.