मागवला मोबाईल, निघाला बेल्ट

0
13

ऑनलाइन व्यवहार करताना सावधान; तुमचीही फसवणूक होऊ शकते
गोंदिया, ता. २४ ः सद्यःस्थितीत आॅनलाइन व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले असून, बहुतांश ठिकाणी फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आॅनलाइन व्यवहार करताना काळजी घेऊनच व्यवहार करावा, अन्यथा मोठी आर्थिक फसवणूक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील धापेवाडा येथे उघडकीस आला. एका युवकाने मोबाईल मागविला असता, त्याच्या हातात पोस्टातील पार्सलमधून चक्क बेल्ट पडला. तथापि, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने दवनीवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, धापेवाडा येथील शिवानंद भोजराज भेलावे (वय ३०) याला एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. चार हजार ६०० रुपयांना मोबाईल फोन मिळेल, असे त्यावरून सांगण्यात आले. दरम्यान, २१ मे रोजी पोस्ट आॅफीसमार्फत शिवानंद भेलावे याच्या नावाने एक पार्सल आले. सांगितल्यानुसार, चार हजार ६०० रुपये भेलावे याने पोस्ट आ ॅफीसमध्ये भरले व पार्सल घेतले. नंतर काही क्षणातच पोस्ट आॅफीसमध्येच हे पार्सल उघडून पाहिले असता, सदर पार्सलमध्ये मोबाईल फोन नाही, तर एक बेल्ट (कमरपट्टा) निघाला.
यात आॅनलाइन फोनवरून फसवणूक झाल्याची तक्रार भेलावे याने दवनीवाडा पोलिसांत केली आहे. दरम्यान, ठाणेदार सतीश जाधव यांनी शाखा डाकपालास पत्र पाठवून सदर पार्सल आपल्या कोणत्या कार्यालयात, कोणत्या व्यक्तीकडून किंवा कंपनीकडून पाठविण्यात आले, त्यांच्याशी संपर्क करावा, भरणा केलेली रक्कम पुढे पाठवू नये, असे सांगितले आहे.