ट्रकची ऑटोरिक्षास धडक, चार ठार, तीन गंभीर…

0
145

वर्धा : दोन दिवसातील काही अपघातानंतर आता एक मोठा भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. नागपूर ते मुंबई महामार्गावर एका अज्ञात ट्रकची रिक्षास धडक बसली. त्यात दोघे जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच रिक्षात बसलेले अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार,  ऑटोरिक्षा पुलगावकडे निघाली होती. त्यात आठवडी बाजार करण्यासाठी सात जण प्रवास करीत होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने ट्रक येत होता. भरधाव  ट्रकने केळापूर जवळ रिक्षास जोरदार धडक दिली.  वेगात धडक बसल्याने रिक्षाचा चेंदामेंदा झाला. तसेच दुर्गबाई मसराम व सतीश नेहारे या दोघांचा जागीच करुण अंत झाला.या अपघाताची खबर लगेच परिसरातील गावात पोहचली. केळापूर येथील पोलीस पाटील रोशन भोवटे व सहकारी घटनास्थळी धाव घेत पोहचले. त्यांनी मिळून प्रथम जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ केली. यापैकी  भीमराव पाटील व सुनीता कोरोती यांचा उपचार सुरू असतांनाच मृत्यू झाला. ऑटोचालक सागर मराठे व अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. धडक दिल्यानंतर ट्रकचालक घटना स्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी पुलगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनेने केळापूर या गावावर शोककळा  पसरली आहे.