जन्मदात्या बापाकडून मुलाची निर्घृण हत्या

0
308

भंडारा : सहा दिवसांपूर्वी मोहगाव खदान येथे जुन्या वादातून साठ वर्षीय वृद्धाच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच  तुमसर तालुक्यात पुन्हा एका हत्येचा थरार घडला. जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना  शनिवार दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास रोंघा येथे घडली आहे. एकनाथ धनराज ठाकरे, ३४, रा. गोवर्धन नगर तुमसर असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. गोबरवाही पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, एकनाथ हा तुमसर लघु पाटबंधारे विभागातील मृदा व जलसंधारण विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होता. तुमसर येथील गोवर्धन नगरात तो कुटुंबासह राहत होता. मात्र एकनाथला पैशांची अडचण भासत असल्याने तो नेहमीच वडिलांकडे पैशाची मागणी करीत असे. एकनाथचे वडील आरोपी धनराज डोमा ठाकरे(५८, रोंघा) हा मात्र पैसे देण्यास नकार देत होते. घटनेच्या दिवशी एकनाथ तुमसर वरून गावाला आला होता. त्याने वडिलांकडे पैशाची मागणी केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोप्याला जावून अखेर रागाच्या भरात बापानेच लेकाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. मृतक एकनाथ रक्ताच्या थारोळ्यात पाडून होता तर रागाच्या भरात पोटच्या पोराला यमसदनी पोहचविणारा आरोपी बापही सुन्न होऊन तिथेच बसून होता. पोलिसांनी आरोपीला तेथूनच ताब्यात घेतले.