गोंदिया, ता. १९ ः तलवारीने केक कापून जल्लोष साजरा करीत असतानाच मित्रांनी बंदूक हातात घेऊन हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेचे गांभीर्य आेळखून पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. तीन जणांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई मंगळवारी (ता. १७) येथे करण्यात आली.
तलवारीद्वारे केक कापून तसेच हातात बंदूक घेऊन नाचण्याचा व वाढदिवसाचा जल्लोष साजरा केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
तथापि, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी प्रसारित व्हिडिआेची शहानिशा करून सत्यता पडताळणी केली.
यात आरोपी जितेंद्र तेजलाल येडे (वय २८, रा. घिवारी, ता. गोंदिया) हा स्वतःचा वाढदिवस तलवारीने केक कापून सार्वजनिकरित्या जल्लोष करीत साजरा करीत असल्याचे तसेच आरोपी लोकेश झुंगरु खरे (वय २३, रा. किन्ही ता. गोंदिया) हा आपल्या हातात बंदूक घेऊन नाचून आनंद साजरा करत असल्याचे आणि तिसरा आरोपी तेजलाल गोपीचंद येडे (वय ५७, रा. घिवारी, ता. गोंदिया) हा त्याच्या जवळील बंदुकीतून हवेत गोळीबार करून जल्लोष करीत असल्याचे दिसून आले. या तिघांनाही पोलिसांनी मंगळवारी (ता. १७) ताब्यात घेऊन जेरबंद केले. यातील आरोपी तेजलाल गोपीचंद येडे हे माजी सैनिक असून त्याच्याकडे मोठ्या (१२ बोर बंदुकीचा) परवाना आहे. परंतु, त्याने २०११ पासून सदर १२ बोर बंदुकीचा परवाना नूतनीकरण केला नसल्याचे आढळून आले. याच बंदुकीतून मुलाच्या वाढदिवशी त्याने हवेत गोळीबार केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक शरद सैदाने, पोलिस अंमलदार राजू मिश्रा, महेश मेहर, भूवनलाल देशमुख, तुलशीदास लुटे, चित्तरंजन कोडापे, सोमेंद्र तुरकर, सुबोध बिसेन, छगन विठ्ठले, घनश्याम कुंभलवार यांनी केली.