गडचिरोली : शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या वाहनाला समोरासमोर धडक देऊन एका मालवाहू ट्रकने पळ काढला. छत्तीसगड सीमेकडील भागात झालेल्या या अपघातात शेडमाके यांच्या कारच्या समोरील भागाचे बरेच नुकसान झाले, मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही. पण गाडी लॅाक झाल्यामुळे त्यांना एक ते सव्वा तासपर्यंत गाडीतच अडकून राहावे लागले. रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या मदतीने ते कसेबसे गाडीतून बाहेर येऊ शकले.
शेडमाके हे वैयक्तिक कामासाठी छत्तीसगडमधील रायपूर येथे जाऊन परत येत होते. पेंढरीच्या सामोर 16 ते 17 किलोमीटर अंतरावर जांभळी झोरा गावालगतच्या एका वळणावर अज्ञात ट्रक चालकाने वासुदेव शेडमाके यांच्या गाडीला (क्रमांक MH33, V 5121) संध्याकाळी 7.30 च्या दरम्यान एका बाजुने जोरदार धडक दिली. यानंतर ट्रक चालकाने तिथे न थांबता ट्रकसह पळ काढला. या अपघातात शेडमाके सुखरूप बचावले.
राष्ट्रीय महामार्गांची झालेली दुरावस्था आणि त्यातून वाहनचालकांची होत असलेली कसरत यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी विधानसभा संघटक नंदु कुमरे यांनी केली आहे.