बुलढाणा: आदिवासी कुटुंबातील आठ सदस्यांना अन्नातून विषबाधा होऊन दोन चिमुकले मृत्युमुखी पडले. उर्वरित सहा जणांवर अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. दरम्यान आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी याला दुजोरा दिला असून दोघा चिमुकल्यांचा शवविच्छेदन (पोस्ट मार्टम) अहवाल प्राप्त झाल्यावरच मृत्यूचे नेमके कारण सांगता येईल असे स्पष्ट केले आहे.
रोशनी सुनील पावरा (वय २ वर्षे ) आणि अर्जुन सुनील पावरा (वय ६ वर्षे) अशी दुर्देवी बहिण- भावाची नावे आहेत. दरम्यान इतर ६ जणांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अकोला येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारसाठी हलविण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून इतर रुग्णांची प्रकृती ‘स्थिर’ असल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यातील दादुलगाव येथे सध्या या परिवाराचे वास्तव्य आहे. दादुलगाव गावा शेजारी शिवचरण घ्यार यांच्या शेतात बांधमकामात वापरायच्या विटा बनविल्या जातात. या आधुनिक विटभट्टीवर वेगवेगळ्या भागातील नातेवाईक असलेले आदिवासी कुटुंब कामाला आहेत. हे सर्व मजूर आपल्या परिवारासह घ्यार यांच्या शेतातच राहतात. लहान मोठे मिळून जवळपास साठ जण शेतातच वास्तव्याला असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार मागील २२ सप्टेंबरच्या रात्री उशिरा यातील कमीअधिक आठ जणांना उलट्या, मळमळ, हगवण असा त्रास सुरू झाला. आठ बधितांवर अगोदर दादुलगाव मधील एका खाजगी डॉक्टरने उपचार केले.
घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला पाटील सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांचेसमवेत जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद जाधव, डॉ. काळे, डॉ. थिगळे, डॉ. रुपाली घोलप यांचाही समावेश होता. या आरोग्य पथकाने बाधित रुग्णांवर उपचार केले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेने सर्व रुग्णांना खामगाव येथील उप जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान दोन चिमुकल्या भावंडाचा मृत्यू ओढावला.