दुचाकींची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

0
91

अमरावती: दुचाकींची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी शिरजगाव कसबा-देऊरवाडा मार्गावरील वळणावर घडला.

कुणाल नरेश भुते (१८) व शेख मुस्ताक शेख गौसुद्दीन (३२) दोघेही रा. देऊरवाडा अशी मृतांची तर विनोद रामकृष्ण फिसके (३५) रा. देऊरवाडा व सारंग नामदेव संभे (१८) रा. शिरजगाव कसबा अशी जखमींची नावे आहेत. शनिवारी दुपारी शिरजगाव कसबा-देऊरवाडा मार्गावरील वळणावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील कुणाल व शेख मुस्ताक यांचा मृत्यू झाला. तर विनोद व सारंग हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शिरजगाव कसबा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व गंभीर जखमी विनोद व सारंगला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. शिरजगाव पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.