महावितरणच्या भरारी पथकाने शोधल्या विदर्भातील 2,421 वीजचो-या

0
72

नागपूरदि. 9 जानेवारी 2025महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागा अंतर्गत सुरक्षा व अंमजबावणी विभागातील भरारी पथकाकडून एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत संपुर्ण विदर्भातील एकूण 7 हजार 984 ग्राहकांची तपासणी करण्यात आली. यापैकी 2 हजार 421 ग्राहकांकडे विजचोरी आढळून आली. या ग्राहकांविरूध्द भारतीय विद्युत कायदा 2003, सुधारीत 2007 च्या कलम 135 अन्वये कारवाई करून तब्बल 17.39 कोटी रुपये किंमतीच्या विजचोरीचे प्रकरणे उघडकीस आणली. याशिवाय विद्युत कायदा 2003 कलम 126 अन्वये व इतर 1 हजार 466 प्रकरणांमध्ये 14.56 कोटी कोटी रुपये किंमतीच्या वीज वापरातील अनियमितता उघडकीस आणली.

वीज चोरीच्या या सर्व प्रकरणांतून एकूण 31.95 कोटी रुपये इतक्या रकमेचे निर्धारण करून त्यापैकी 26.69 कोटी रुपये संबंधीत ग्राहकांकडून वसूल करण्यात आले आहे. तसेच विजचोरीची रक्कम न भरलेल्या 207 वीज ग्राहकांविरूध्द विविध पोलीस स्टेशन मध्ये विजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 ग्राहकांना अखंडीत व दर्जेदार विज पुरवठा देण्यासाठी महावितरण सातत्याने प्रत्यनशील असतांना विज वितरण हानी व विजचोरीमुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. सदरचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी कंपनीमध्ये सुरक्षा व अंमलबजावणी विभाग अविरतपणे काम करीत आहे. कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमजबावणी), मुंबई यांच्या अधिपत्याखाली नागपूर प्रादेशिक विभागा अंतर्गत उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) यांच्या देखरेखी खाली विदर्भात मंडल स्तरावर 12 भरारी पथके व विभागीय स्तवरावर 3 भरारी पथके तसेच नागपूर व अकोला येथे सुरक्षा व अंमलबजावणी परिमंडल कार्यरत असून त्यांच्यामार्फ़त वीज चोरी विरोधातील ही मोहीम राबविण्यात आली आहे

विजचोरी हा सामाजिक अपराध असुन त्यामुळे महावितरण सोबतच समाजाचे देखील मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने सर्व नागरिकांनी त्यांच्या परिसरात होत असलेल्या विजचोरीची माहिती स्थानिक भरारी पथके, सुरक्षा व अंमलबजावणी कार्यालये किंवा जवळच्या महावितरणच्या कार्यालयास देण्याचे आवाहन करण्यात आले असून. विजचोरी प्रकरणाची माहिती देण्या-या व्यक्तीस महावितरणकडून यथायोग्य बक्षिस दिल्या जात असून माहिती देण्या-यांचे नाव सुद्धा गोपनीय ठेवले जात असल्याची माहीती देखील महावितरणकडून देण्यात आली आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमजबावणी) सौ. अपर्णा गिते (म.पो.से), उप संचालक सुनिल थापेकर, उप संचालक (सुरक्षा व अंमजबावणी), नागपूर परिक्षेत्र व त्यांच्या अधिपत्यातील सुरक्षा व अंमलबजावणी विभागातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी हे विजचोरीमुळे महावितरणचे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृतपणे वीज पुरवठा घेवून सहकार्य करण्याचे आवाहन देखील महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.