लोणावळ्यातून जनसंघर्ष घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार गजाआड

0
19

यवतमाळ:-  जिल्ह्यातील दिग्रस पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या जनसंघर्ष अर्बन निधी लि.च्या तब्बल ४७ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार प्रणित देवानंद मोरे याला अखेर पोलिसांनी मंगळवारला पुणे-लोणावळा येथून अटक केली. त्याच्यासह अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे, प्रीतम देवानंद मोरे आणि जयश्री देवानंद मोरे या चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दिग्रस पोलिसांनी तब्बल ३६ दिवसांच्या तपासानंतर या प्रमुख आरोपींना पकडण्यात यश मिळवले असून आज बुधवार दि. १५ जानेवारीला दारव्हा न्यायालयात सर्व आरोपींना हजर करण्यात येणार आहे.

जनसंघर्ष निधी लि.च्या सात शाखांमधून नागरिकांचे पैसे गुंतवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणी अध्यक्ष, संचालक, उपाध्यक्ष यांच्यासह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील साहिल जयस्वाल, अनिल जयस्वाल आणि पुष्पा जयस्वाल यांना आधीच अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य सूत्रधार प्रणित मोरे आणि त्याचे कुटुंबीय फरार होते.

प्रकरण गंभीर असल्याने दिग्रस पोलिसांनी विशेष पथक तयार करून आरोपींच्या मागावर तपासाची चक्रे फिरवली. पुणे आणि लोणावळा परिसरात आरोपी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचून मंगळवारी त्यांना अटक (arrested)  केली. या अटकेने ठेविदारांना दिलासा मिळाला असून पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपली जीवनभराची कमाई गमावलेल्या ठेविदारांना आता न्यायाची आस आहे. अटकेत असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करून नुकसान भरून दिली जावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून लवकरच घोटाळ्याचा पूर्ण उलगडा होईल, अशी अपेक्षा आहे.

पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आरोपींच्या अटकेने ठेविदारांचा विश्वास पुन्हा जागृत झाला आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास कसा होतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.