लिफ्ट मागूण लुबाडणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

0
242

गोंदिया,दि.१५:: लिफ्ट मागणार्‍या एका प्रवाशावर धारदार शस्त्राने वार करून त्याच्याकडील रोख घेऊन पसार झालेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.बादल रतनसिंग सोलंकी (21) रा. जळगाव (जामोद) व गोपाल मंगलसिंग राठोड (37) रा. मानेगाव ता. जळगाव (जामोद) जि. बुलढाणा अशी जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना छतीसगड राज्यातील बरौंदा जि. रायपूर येथून ताब्यात घेतले.

फिर्यादी सुरज जगू यादव (30) रा. तुबडीबाड ता. डोंगरगाव, जि. राजनांदगाव (छतीसगड) हे गावी जाण्यासाठी प्रवासी वाहनाची वाट पाहत असताना त्यांनी एका विना क्रमांकाच्या पांढर्‍या रंगाच्या बोलेरो मॅक्स पिकअप वाहनाला थांबवून लिफ्ट मागीतली. दरम्यान नॅशनल हायवे 53 वर देवपायली नाल्याजवळ आरो वाहनातील एकाने सुरज यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून शर्टच्या खिशातील रोख 12 हजार रुपये हिसकावुन घेत त्यांना धक्कादेत वाहनाबाहेर काढले. हा प्रकार 14 फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडला. सुरज यांनी जखमी अवस्थेत डुग्गीपार पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठांच्या निर्देशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि धीरज राजूरकरांनी त्यांच्या सहकार्‍यांसह घटनास्थळ गाठून घटनाक्रम जाणून घेतला. गोपनीय माहिती व टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. संशयित वाहन व आरोपींचा माग काढून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आरोपी बादल सोलंकी, गोपाल राठोड यांना बरौंदा येथेन ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवी केली. दरम्यान पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलीे. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. आरोपींना डुग्गीपार पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले असून रोख व गुन्ह्यातील हत्याराबाबत तपास डुग्गीपार पोलिस करीत आहेत.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशाने उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग विवेक पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि धीरज राजूरकर, पोहवा इंद्रजीत बिसेन, सुबोध बिसेन, दुर्गेश तिवारी, पोशी अजय रहांगडाले, राम खंदारे यांनी केली. डुग्गीपारचे पोलीस निरीक्षक मंगेश काळे, पोहवा अग्निहोत्री, रामटेके, चकोले, डहाके यांनी सहकार्य केले.