शेतीच्या वादात मुलाने चिरला वडिलांचा गळा

0
87

यवतमाळ : शेतीच्या वादातून मुलाने चाकुने गळा चिरून वडिलांची हत्या केली. ही घटना कळंब तालुक्यातील मेंढला या गावी, गुरूवारी पहाटे घडली. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी २४ तासाच्या आत मारेकरी मुलास अटक केली. या घटनेने मेंढला गावात खळबळ उडाली आहे.
सुभाष झोलबाजी चौधरी  (५२) रा. मेंढला ता. कळंब असे मृतकाचे नाव आहे. तर प्रफुल्ल सुभाष चौधरी (२४) रा. मेंढला असे आरोपीचे नाव आहे. वडील सुभाष चौधरी यांनी आरोपी प्रफुल्ल चौधरी याच्या नावावर अडीच एकर शेती करुन दिली होती.मात्र तो शेती करीत नसल्याने शेती आपल्या नावावर करून दे, असा तगादा वडिलांनी लावला होता. यावरुन वडील सुभाष व मुलगा प्रफुल्ल यांच्यात वाद सुरू होता. बुधवारी, १९ फेब्रुवारी रोजी घरात सर्व जण झोपी गेल्यानंतर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आरोपी प्रफुल्ल याने चाकूने वडिलांच्या गळ्यावर वार केले.

यावेळी त्यांनी आरडा ओरड केल्याने दुसरा मुलगा व मुलगी जागे झाले. त्यामुळे आरोपीने तेथून पळ काढला. गळा चिरल्याने सुभाष चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. शेत जमीन नावावर करण्याच्या वादातून झालेल्या या वादात वडिलांना जीव गमवावा लागल्याने चौधरी कुटुंबाला धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.