गावगुंड वर्षभरासाठी कारागृहात स्थानबध्द

0
101

गोंदिया : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याच्या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलिस अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. त्यातंर्गत गुन्हेगारांचा पुर्व इतिहास लक्षात घेत कारवाई केली जात आहे. गोरेगाव तालुक्यातील कुर्‍हाडी येथील एका गावगुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला एक वर्षासाठी अमरावती कारागृहात स्थानबध्द करण्यात येणार आहे. शाहरुख हमीद शेख (२६) रा. वार्ड नंबर २ कुर्‍हाडी असे सर्राइत गुन्हेगाराचे नाव आहे.

सविस्तर असे की,जिल्हा पोलिसांकडून गुन्हेप्रवृत्तींच्या लोकांचे रेकॉर्ड तपासले जात आहेत. त्यातून ज्या गुन्हे प्रवृत्तींच्या लोकांपासून जिल्ह्यातील शांतता व कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यात अडचण निर्माण होत आहे. अशा गुन्हे प्रवृत्तींच्या लोकांवर तडीपार व एमपीडीए अंतर्गत कारवाईचा बडगा जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे यांनी उगारला आहे.

गोरेगाव पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या कुर्‍हाडी येथील शाहरुख हमीद शेख (२६) या सर्राइत गुन्हेगाराविरूध्द अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याची गुन्हेगारी पार्श्वभुमी लक्षात घेत गोरेगाव पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्याकडे सादर करण्यात आले.

या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करीत जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सराईत गुन्हेगार शाहरूख शेख याला एक वर्षाकरीता अमरावती येथील कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहे. या कारवाईमुळे गुन्हे प्रवृत्तींच्या लोकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.