आरोग्य सेवेसाठी अपडेट राहण्याचे जि.प.उपाध्यक्षांचे निर्देश

0
67

आरोग्य समितीच्या सभेत विविध विषयावर चर्चा

गोंदिया,दि.०६ : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत येणाऱ्या काही आरोग्य केंद्रामध्ये सेवेला कर्मचारी व अधिकारी बुट्टी मारताना दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. यासाठी जि. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य विषय समितीचे सभापती सुरेश हर्षे यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वर्ग घेत आरोग्य सेवेकरीता अपडेट राहण्याचे निर्देश दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित आरोग्य विषय समितीच्या सभेत ते बोलत होते.

दरम्यान आपण कधीही आरोग्य संस्थांना आकस्मिक भेट देणार, असल्याचा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य संस्थांची सेवा आणखी सुदृढ करण्याच्या उद्देशाने आरोग्य समितीची मासिक सभा घेण्यात आली. पहिल्यांदाच मासिक सभेत जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान जि.प. उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी आरोग्य सेवा सदृढ करण्याच्या अनुसंगाने यंत्रणेने कामाला लागावे, कुठलाही कामचुकारपणा करूनये, अशा सुचना दिल्या. त्याचबरोबर सर्व केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. केंद्रामध्ये हलचल रजिस्टर, रुग्ण कल्याण समितीच्या सभा नियमित घेण्यात याव्या, जनप्रतिनिधीशी समन्वय ठेवावे, शक्यतो रेफर टु गोंदियाचा फार्म्युला काढून संस्थांमध्ये प्रसुतीचे प्रमाण वाढावे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी सातत्याने संस्थांना भेट देवून तशी टिप्पणीही अपडेट करावी. एंकदरीत आरोग्यसेवेसाठी यंत्रणेने अपडेट रहावे, अशा सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या सभेत मुकाअ मुरूगानंथम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जि.प. सदस्य तथा समिती सदस्य रूपेश कुथे, भुमेश्वर पटले, सुधाताई रहांगडाले, छायाताई नागपुरे, गिता नागपुरे, वैशाली पंधरे, डॉ. अभिजीत गोंधळे, डॉ. महेंद्रकुमार धनविजय, डॉ. अरविंदकुमार वाघमारे, डॉ. रोशन राऊत, डॉ. निरंजन अग्रवाल, डॉ. विनोद चव्हाण उपस्थित होते.