गडचिरोली : रोखलेले पुरवणी पगार बिल काढण्यासाठी ना देय प्रमाणपत्रावर सही करण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने चक्क दिड लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो 1 लाख 30 हजार रुपये घेण्यास तयार झाला. पण आरोग्य सेवा देताना मेवा खाण्याची हाव सुटलेल्या त्या डॅाक्टरला अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) बेड्या ठोकल्या. भामरागड तालुक्याच्या अतिदुर्गम भागात पहिल्यांदाच एसीबीने अशी धाडसी कारवाई करून आम्ही कुठेही पोहोचू शकतो, हा संदेश दिला आहे.
डॅा.संभाजी भोकरे (36 वर्ष) असे त्या लाचखोर वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, डॅा.भोकरे हे अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त लाहेरी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्ग-1 वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. दरम्यान त्यांच्याच अधिनस्थ असलेल्या एका कर्मचाऱ्याचे सप्टेंबर 2024 आणि नोव्हेंबर महिन्याच्या 14 दिवसांच्या रोखलेल्या पगाराच्या पुरवणी बिलासाठी कार्यालय प्रमुख म्हणून डॅा.भाकरे यांच्या सहीचे प्रमाणपत्र गरजेचे होते. त्यासाठी डॅा.भाकरे याने दिड लाखांची मागणी केली. तडजोडीअंती 1 लाख 30 हजार रुपये घेण्यास डॅा.भाकरे तयार झाला. यादरम्यान त्या कर्मचाऱ्याने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने दि.3 फेब्रुवारी आणि 25 मार्च रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर डॅा.भोकरे याला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पो.निरीक्षक संतोष पाटील, पो.नि.शिवाजी राठोड, सहा.फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार राजेश पद्मगिरीवार, हवालदार किशोर जौंजारकर, हवालदार स्वप्निल बांबोळे, अंमलदार संदीप उडान, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके, हितेश जेट्टीवार, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्सना वसाके, चालक हवा.राजेश्वर कुमरे आदींनी केली.