बनावट खताच्या रॅकेटचा पर्दाफाश, वाशिममध्ये ९ लाखांचा मुद्देमाल जप्त;एकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
36
वाशिम,दि.५ जुन– वाशिम कृषी विभागाने बनावट रासायनिक खताच्या साठवणुकीचा पर्दाफाश करत मानोरा तालुक्यातील कारपा येथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ९ लाख ५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दिनेश चव्हाण नावाच्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम, आरिफ शाह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पथकाने ३ जून २०२५ रोजी कारपा, तालुका मानोरा येथे छापा टाकला. छाप्यात कुठलाही मजकूर नसलेल्या ३३० खताच्या रिकाम्या गोण्या आणि नामांकित खत कंपनीचा मजकूर छापलेल्या २७० गोण्या असा एकूण ६०० गोण्यांचा साठा आढळून आला.
संशयित साठवणूकदार दिनेश चव्हाण यांची चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत आणि कोणताही विक्री परवाना सादर केला नाही. प्राथमिक तपासणीत असे निष्पन्न झाले की, संबंधित व्यक्ती साध्या बनावट गोण्यांमधील खत नामांकित ब्रँडेड खत कंपनीच्या गोण्यांमध्ये पॅक करत होता. हे बनावट खत जयपूर, राजस्थान येथून आणल्याचे त्यांच्याकडून मिळालेल्या बिलांवरून समोर आले आहे. विशेष म्हणजे, या बिलांवर साठा ताब्यात असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे किंवा आस्थापनेचे नाव किंवा स्वाक्षरी नव्हती, ज्यामुळे हा खत साठा अवैध आणि बोगस असल्याच्या संशयाला दुजोरा मिळाला.
संशयित आरोपी बनावट खत आयात केलेले खत म्हणून विकत असल्याचे दिसून आले. त्याने सादर केलेल्या बिलानुसार, हे खत केवळ २.५० रुपये प्रति किलोग्राम इतक्या कमी किमतीत खरेदी केले होते. आरोपीने केवळ १५० रुपये प्रति गोणी किमतीच्या गोणीवर १४७० रुपये प्रति गोणी किंमत छापून जवळपास ८ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, गोणीवर शासनाच्या सबसिडी क्लेम केल्याचा मजकूर छापून शासनाचीही फसवणूक केली आहे.
या गंभीर गुन्ह्यांसाठी, संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३, रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील एकूण १४ कलमांखाली मानोरा पोलीस ठाण्यात कृषी अधिकारी संदीप सावळे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत पथक प्रमुख अभिजित देवगिरकर (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम), गणेश गिरी (मोहीम अधिकारी, वाशिम), रोशन भागवत (तालुका कृषी अधिकारी, मानोरा), अरुण इंगळे (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, वाशिम), उमेश राठोड (मंडळ कृषी अधिकारी, मानोरा), आणि संदीप सावळे (कृषी अधिकारी, पंचायत समिती मानोरा) यांचा समावेश होता. पोलीस प्रशासनाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप अल्लापूरकर आणि हेड कॉन्स्टेबल निमाने यांनी मोलाचे सहकार्य केले. विभागीय गुणवत्ता नियंत्रण भरारी पथकाचे प्रमुख राजेश जानकर आणि सदस्य श्रीकांत नागे यांनी उपस्थित राहून तांत्रिक मार्गदर्शन केले.
कृषी विभागाने नागरिक आणि शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे कुठे बनावट कृषी निविष्ठांबाबत गैरव्यवहार होत असल्याचा संशय आल्यास, त्यांनी कृषी विभागाने प्रत्येक कृषी केंद्रावर प्रसिद्ध केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून जिल्हा तक्रार निवारण समितीला माहिती द्यावी. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.