डव्वा-खजरी दरम्यान पुन्हा शिवशाही बसचा अपघात,मात्र जिवितहानी टळली

0
490

गोंदिया,दि.०१- गोंदिया कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर आज १ जुर्ले रोजी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास डव्वा-खजरी दरम्यान शिवशाही बसचा अपघात झाल्याची घटना घडली.गेल्या वर्षी २९ नोव्हेंबर रोजी याच मार्गावर याच परिसरात शिवशाही बसचा अपघात होऊन ११ प्रवाशांना आपला जीव गमावावा लागला होता.मात्र आजच्या अपघातात कुठलीही जिवीत हानी झाली नसल्याने अनुचित घटना टळली.घटनेची माहिती होताच राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व डुग्गीपार पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदत कार्यास सुरवात केली.गोंदियावरुन नागपूरला जाण्याकरीता एमएच ०६,बीड्ब्लू ११७० ही शिवशाही बस निघाली.गोंदिया कोहमारा मार्गावरील डव्वा ते खजरी दरम्यान विरुध्द दिशेने येत असलेल्या मोटारसायकलस्वारास वाचविण्याकरीता बसचालकाने एकदम स्टियरिंग फिरविल्याने बस अनियंत्रित होत विरुध्द दिशेला जात शेतात शिरली.त्यावेळी या बसमध्ये २५-३० प्रवाशी प्रवास करीत होते.या घटनेत चालकाला थोडीफार दुखापत झाली असून महामार्गाने जाणार्या इतर नागरिकांनी आपले वाहन थांबवित बसमधील प्रवाशाच्या मदतीला धावले.