32.1 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता शेतकऱ्याकडून लाच घेतांना सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी दलालासह अडकला

शेतकऱ्याकडून लाच घेतांना सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी दलालासह अडकला

0
6549

blank

बुलढाणा,दि.२३ः जिल्हा पुरवठा कार्यालयात सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर कार्यरत आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा पदभार सांभाळत असलेला आणि जिल्हा लेखा परीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या दोघांना बुलढाणा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गजानन नंदकिशोर टेकाळे, वय ४० वर्षे, पद-सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, पदभार जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलढाणा, वर्ग-२,रा. खडकपुरा वार्ड नं. २१, सोनार सभागृहा जवळ, चिखली ता.चिखली जि.बुलढाणा व देवानंद गंगाराम खंडाळे, वय ६२ वर्षे, सेवानिवृत्त जिल्हा लेखा पर्यवेक्षक रा.तानाजी नगर,ता. जि.बुलढाणा अशी ह्या दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.
७०,००० रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोड करीत अखेरीस ५०,००० रुपयांवर देण्याचा नव्हे तर घेण्याचा सौदा ठरला होता.त्यापैकी २५,००० रुपयांचा पहिलाच हफ्ता स्वीकारत असताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ह्या दोघांनाही चतुर्भुज केले.बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातच आज दिनांक २३.०७.२०२५ रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदार हे शेतकरी असून त्यानी शासनाच्या हमी भाव केंद्रावर ज्वारी विक्री केलेली आहे. विक्री केलेल्या ज्वारीचे देयक काढण्या साठी कोणतीही अडचण येवू न देण्यासाठी व त्यांना भविष्यात त्यांच्या ज्वारी विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचाही प्रभार असलेल्या सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे हे लाचेची मागणी करीत असल्याबाबतची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा कार्यालयाकडे लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने दिली होती.
 त्यानुसार दिनांक २१.०७.२०२५, २२.०७.२०२५ व दि.२३.०७.२०२५ रोजी लाचमागणी पडताळणी करण्यात आली होती.त्यात सत्यता आढळून आली होती. गजानन टेकाळे, व खाजगी व्यक्ती देवानंद खंडाळे यांनी तकारदार यांना ७०,००० रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती ५०,०००  रूपये स्विकारण्याचे मान्य केले व त्यापैकी पहीला हप्ता २५,००० रुपये स्विकारण्यास संमती दर्शविली व उर्वरीत २५,००० रुपये ज्वारीचे देयक निघाल्यानंतर स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरून आज बुधवार दिनांक २३.०७.२०२५ रोजी सापळा लावण्यात आला असता लाचखोर गजानन टेकाळेच्या वतीने खाजगी व्यक्ती देवानंद खंडाळे, सेवानिवृत जिल्हा लेखा पर्यवेक्षक याने पंचासमक्ष लाचेचा पहीला हप्ता २५,००० रुपये स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. दोघांनाही ताब्यात घेवुन त्यांचेविरुद्ध लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारल्या बाबत पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु आहे.
सदरहू कारवाई भागोजी चोरमले, पोलीस उपअधिक्षक,एसीबी, बुलढाणा,सापळा पथक पो.नि.रमेश पवार, पो.नि. विलास गुंसीगे, सफौ.शाम भांगे, पोहेकॉ. प्रविण बैरागी, राजेद्र क्षीरसागर, पोना.जगदीश पवार,पोकॉ.रंजित व्यवहारे,शैलेश सोनवणे,गजानन गाल्डे मपोकॉ.स्वाती वाणी चानापोका.नितीन शेटे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

blank