अहिल्यानगर,दि.२७ः शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अहिल्यानगर (अहमदनगर) पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या एका पोलीस उपनिरीक्षक आणि तीन शिपायांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड कोटींची लाच ऑनलाइन घेतल्याचे समोर आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
या ऑनलाइन लाचखोरीची पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षकासह चौघांना निलंबित करून त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात शेअर मार्केट घोटाळा प्रकरणात शिर्डी पोलीस ठाण्यात ६ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी भुपेंद्र सावळे याला या प्रकरणात अटक करण्यात आली होती.गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याकारणाने हा गुन्हा स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी युवराज आथरे या गुन्हयाचा तपास करीत होते. आरोपी भुपेंद्र सावळे याला अटक करण्यात आल्यावर आरोपीचे बँक खाते तपासत असताना अधिकाऱ्यांना दीड कोटींचा ऑनलाइन व्यवहार आढळुन आला. या ऑनलाइन व्यवहाराची चौकशी करीत असतांना दीड कोटींची रकम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव याच्या खात्यावर टाकण्यात आल्याचे समोर आले. आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी भुपेंद्र सावळे याच्याकडे चौकशी केली असता त्याने कबूल केले की दीड कोटींची रक्कम पोलीस उपनिरीक्षक धाकराव यांना जानेवारी महिण्यात ऑनलाइन पाठविण्यात आली होती.ही रक्कम गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याला देण्यात आली होती. खोलात जाऊन चौकशी केली असता माहिती त्याने सांगितले की, “१५ जानेवारी २०२५ रोजी मला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, व त्यांच्या सोबत असलेले तिन कर्मचारी यांनी मी व दोन भाऊ आणि मित्र असे सर्व जण नाशिकला जात असताना लोणी गावाजवळ आम्हाला अडवून धाकराव मला म्हणाले की तुझ्या कडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कोणत्याही प्रकारचे लायसन्स नसताना जनतेकडून पैसा गोळा करून जनतेची फसवणूक करतो म्हणून तुझ्यावरच गुन्हा दाखल करतो. मी त्यांना म्हणालो की माझ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करु नका. मी कोणाचीही फसवणूक केली नाही. मला विनाकारण कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवू नका त्यावर ते व त्यांच्या सोबत असलेले तिन पोलिस कर्मचारी म्हणाले की “तुला जर या गुन्ह्यातून सलामत सुटायचे असेल तर तु आम्हाला दीड कोटी रुपये दे”, त्यावर मी धाकराव व त्यांच्या सोबत असलेल्या तिन पोलिस कर्मचाऱ्यांना म्हणालो की माझ्याकडे रोख स्वरुपात पैसे नाहीत तर धाकराव व त्यांच्या सोबत असलेल्या तिन कर्मचाऱ्यांनी मला, माझे दोन भाऊ व मित्र यांच्यासह अहिल्यानगर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील पार्किंग मध्ये घेऊन आले. तेथे थांबल्यावर धाकराव साहेबांनी दीड कोटी रुपये द्या असे सांगितले. खोट्या गुन्ह्यात अडकण्यापेक्षा पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकरावनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी दिलेल्या खात्यावर मी ऑनलाईन पद्धतीने दीड कोटी रुपये ट्रान्स्फर केले” अशी आरोपीनी माहिती दिली.
या प्रकरणाची दखल खुद्द पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घेऊन तात्काळ पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव आणि तीन पोलीस कर्मचारी यांना निलंबित केले असून या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सांगितले.





