
देवरी, दि.१४- देवरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये देवरी पोलिसांच्या वतीने काल बुधवारी (दि.१३) रोजी अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, अनेक शाळांना पोलिस दलाने भेटी देत रॅलीचे आयोजन करून विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.
राज्यात पोलिस महासंचालकांच्या निर्देशानुसार, दरवर्षी दि. १३ ते १८ ऑगस्ट या कालावधीमध्ये अमलीपदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविली जाते. याला अनुसरून गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली देवरीचे ठाणेदार प्रवीण डांगे यांचे नेतृत्वात देवरी पोलिस स्टेशन हद्दीतील डवकीचे सिद्धार्थ हायस्कूल, लोहारा येथील सुरतोली माध्यमिक विद्यालय, शेंडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळा, डोंगरगाव येथील वसंत हायस्कूल येथील शाळांना भेटी देण्यात आल्या. या दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे मानवी जिवणावर होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर शाळेतून विद्यार्थ्यांची गावात रॅली काढून अमलीपदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली.
येत्या १६ तारखेला नशेचे प्रकार, परिणाम आणि त्यावर उपाय यासंबंधी स्थानिक मनोहरभाई पटेल हायस्कूल आणि कमलादेवी हायस्कूल येथे वर्ग ८ ते १० आणि वर्ग ११ ते १२ या दोन गटात निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर १७ तारखेला नशामुक्ती या विषयावर चित्रकला स्पर्धा स्थानिक सी एस पब्लिक स्कूल आणि ब्लासम पब्लिक स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. शेवटी येत्या १८ तारखेला डोंगरगाव येथील वसंत हायस्कूल येथे नशेचे दुष्परिणाम या विषयावर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.




