गोंदिया:जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल (१७ जुलै) रात्री एक खळबळजनक लुटीची घटना समोर आली आहे. अज्ञात बदमाशांनी ट्रक चालकावर जीवघेणा हल्ला करून त्याला बंधक बनवले आणि तब्बल ३० टन ७६५ किलो तांदळाने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक घेऊन पळ काढला. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
घटना नेमकी काय घडली?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ट्रक चालक नवीन श्रीरामचंद्र मौर्य (वय ३५ वर्षे, रा. हनुमानगंज, कतवारपुर, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश) हा मध्य प्रदेशातील चाकघाट येथून तांदूळ भरून सडक अर्जुनीच्या दिशेने जात होता.१७ जुलै २०२६ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास सावरी बस स्टॉपजवळ हा प्रकार घडला.चालक मौर्य हा सावरी बस स्टॉपजवळ ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून विश्रांती घेत होता. दरम्यान, एक अज्ञात इसम ट्रकजवळ आला आणि त्याने पाणी मागितले. चालकाने त्याला पाण्याची बाटली दिली आणि तो मोबाईल पाहत बसला. त्याच वेळी आरोपीने अचानक चाकू काढून ट्रकच्या खिडकीवर वार केला. यात चालकाच्या हाताच्या दोन बोटांना आणि अंगठ्याला गंभीर दुखापत झाली.
चालकाला बेदम मारहाण करून केले बंधक
पहिल्या आरोपीने हल्ला करताच त्याच्या दुसऱ्या साथीदाराने ट्रकचा दुसरा दरवाजा जबरदस्तीने उघडून केबिनमध्ये प्रवेश केला. त्यांनी चालकाला ट्रकमधून खाली ढकलून दिले, ज्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्याच वेळी त्यांचे इतर दोन साथीदारही तिथे पोहोचले. चारही आरोपींनी चालकाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याचे हात-पाय बांधून त्याला बंधक बनवले आणि ३० टन ५७५ किलो तांदळासह टाटा कंपनीचा ट्रक घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
पोलीस तपासाला गती
घटनेनंतर जखमी चालकाने कसाबसा रावणवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी चालकाच्या वैद्यकीय अहवालाच्या आणि तक्रारीच्या आधारे अपराध क्रमांक ३७१/२०२६ अंतर्गत बीएनएसच्या कलम ३०९(4), ११८(1), ३५२, ३५१(2) आणि ३(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.रावणवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पीआय शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीची मदत घेतली जात असून, पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.





