26.7 C
Gondiā
Saturday, July 18, 2026
Home महाराष्ट्र १७० वर्षांचा समृद्ध, गौरवशाली ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाचा स्थापना दिन

१७० वर्षांचा समृद्ध, गौरवशाली ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबई विद्यापीठाचा स्थापना दिन

0
12

युडीआरएफ, प्रशासकीय गुणवत्ता अभियान पुरस्कारांसह वर्धापन दिन व्याख्यानमालेचे आयोजन

कृत्रिम बुद्घिमत्तेच्या युगात शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमाला नवी गती

विद्यापीठांनी उद्योगाभिमुख, तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा स्वीकार करावा

मुंबई, दि. १८ जुलै: कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ नवीन तंत्रज्ञान नसून ते मानवाच्या भविष्याला दिशा देणारी क्रांतिकारी शक्ती आहे. शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि उद्योग या सर्व क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धेमत्तेमुळे आमूलाग्र बदल घडणार असून या बदलांचा स्वीकार करून त्याचा सकारात्मक उपयोग करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या १७० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित स्थापना दिन व्याख्यानमालेत ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. स्थापना दिन व्याख्यानमालेचे १२ वे पुष्प गुंफताना ते म्हणाले, एआयमुळे अत्यंत सक्षम आणि बुद्धिमान यंत्रांची निर्मिती होत असून अनेक बाबतीत त्यांची कार्यक्षमता मानवी क्षमतेच्या जवळ पोहोचली आहे. शिक्षण क्षेत्रात एआयमुळे अध्यापन आणि अध्ययनाच्या पारंपरिक पद्धतीत मोठे बदल घडतील, असे सांगत त्यांनी एआय साधनांचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन केले. तसेच परीक्षापद्धती, अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करून विद्यार्थ्यांचे संकल्पनात्मक ज्ञान अधिक भक्कम करण्यावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. संशोधन क्षेत्रात एआय, मशीन लर्निंग आणि उच्च कार्यक्षम संगणकीय साधनांचा वापर वाढविणे ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी शैक्षणिक संस्थांना आवश्यक संगणकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असल्याने विद्यापीठांनी उद्योग क्षेत्राशी अधिक दृढ सहकार्य निर्माण करावे, असे आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले. उद्योग–शैक्षणिक संस्था सहकार्याच्या माध्यमातून संशोधन, नवोपक्रम आणि कौशल्यविकासाला चालना मिळेल तसेच विद्यापीठ आर्थिकदृष्ट्याही अधिक सक्षम आणि स्वावलंबी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एआयला धोका म्हणून नव्हे तर विकासाचा सहकारी म्हणून स्वीकारून शिक्षण, संशोधन आणि समाजहितासाठी एआयचा प्रभावी वापर केल्यास भारत ज्ञान, नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून भारतीय व्यवस्थापन संस्थेचे संचालक प्रा. मनोजकुमार तिवारी यांनी उच्च शिक्षण संस्थानी उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन मार्गक्रमन करण्याचे आवाहन केले. तर ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी मुंबई विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी उच्च शिक्षण संस्थांनी ज्ञाननिर्मितीची केंद्रे, नवोपक्रमाची प्रयोगशाळा आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणास्थाने बनणे आवश्यक असल्याचे सांगितले. आगामी दशकांत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर-फिजिकल प्रणाली, प्रगत संगणन व सेमीकंडक्टर्स, क्वांटम तंत्रज्ञान, प्रगत संप्रेषण, जैवतंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, ऊर्जा कार्यक्षमता तंत्रज्ञान, रोबोटिक्स, ड्रोन, स्मार्ट वाहतूक, प्रगत मटेरिअल्स व नॅनोतंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारखी क्षेत्रे निर्णायक ठरणार आहेत. त्या दृष्टिने मुंबई विद्यापीठाने वाटचाल सुरु केली आहे. नजीकच्या काळात एमटेक इन बॅटरी टेक्नॉलॉजी हा भारतातील पहिला अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात सुरु केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. बीएआरसीच्या माध्यमातूनही नवीन अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे. आयआयटी मद्रास येथील रिसर्च पार्क आणि मुंबई विद्यापीठातील इन्क्युबेशनच्या सहकार्यातून संशोधनाला मोठी गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्र. कुलगुरु प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी मुंबई विद्यापीठाने सुरु केलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने अवलंबलेल्या युडीआरएफ (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क) पुरस्कार आणि प्रशासकीय गुणवत्ता अभियान व प्रशासकीय गुणवत्ता पुरस्काराचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेबद्दल कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी आभार मानले.

युडीआरएफ (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क) पुरस्कार

युडीआरएफ अंतर्गत एकूण ७ वर्गवारीतून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये विज्ञान वर्गवारीतून प्रथम पारितोषिक नॅशनल सेंटर फॉर नॅनो सायन्स अँड नॅनोटेक्नोलॉजी या विभागास सर्वाधिक १५ लाख रुपयांचे अनुदान प्रदान करण्यात आले. द्वितीय पारितोषिक रसायनशास्त्र (स्वायत्त) या विभागास ७ लाखांचे अनुदान देण्यात आले. व्यवस्थापन, उपपरिसरे, आदर्श महाविद्यालये आणि संस्था या वर्गवारीत प्रथम पारितोषिक जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्थेस १० लाखांचे अनुदान देऊन गौरविण्यात आले, तर द्वितीय पारितोषिकसाठी गरवारे व्यवसाय व विकास संस्था यास ५ लाखांचे अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले. तिसऱ्या वर्गवारीतील आंतरविद्याशाखीय अभ्यासशाखेअंतर्गत भूगोल विभागास प्रथम पारितोषिकासाठी रुपये १० लाखांचे अनुदान आणि शारीरिक शिक्षण विभागास द्वितीय पारितोषिकासाठी ५ लाखांचे अनुदान देऊन गौरविण्यात आले. अध्ययन व अभ्यास केंद्रे वर्गवारीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रास प्रथम क्रमांकासाठी ५ लाखांचे अनुदान आणि युरोपीय अभ्यास केंद्रास द्वितीय क्रमांकासाठी २ लाखांचे अनुदान देण्यात आले. मानव्यविज्ञान, वाणिज्य व समाजशास्त्रे या वर्गावारीतून प्रथम क्रमांक म्हणून मुंबई स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी या विभागास १० लाखांचे अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले, तर द्वितीय क्रमांक म्हणून नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागास ५ लाखांचे अनुदान देण्यात आले. भारतीय व परदेशी भाषा विभाग वर्गवारीतून प्रथम क्रमांक जर्मन भाषा विभागास १० लाखांचे अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले. तर द्वितीय पारितोषिकासाठी हिंदी विभागास ५ लाखांच्या अनुदानाने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे सर्वसाधारण वर्गवारीतून प्रथम क्रमांक नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नोलॉजी विभागास सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल १० लाखांच्या अनुदानाने सन्मानित करण्यात आले. तर सर्वोत्कृष्टतेसाठी द्वितीय पारितोषिकाने रसायनशास्त्र विभागास ५ लाखांचे अनुदान देऊन गौरव करण्यात आला. सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेऊन मार्गक्रमण केलेल्या या विभागांना पारितोषिक स्वरुपातील अनुदान संशोधन कार्ये आणि विकासासाठी वापरता येणार आहे.

प्रशासकीय गुणवत्ता अभियान व प्रशासकीय गुणवत्ता पुरस्काराचे मानकरीः

या पुरस्कारांमध्ये निकाल कक्ष व अवैध साधन चौकशी कक्ष, मानव संसाधन विकास कक्ष, विद्यार्थी विकास विभाग, मादाम कामा मुलींचे वसतिगृह आणि नॅशनल सेंटर फॉर नॅनो सायन्स अँड नॅनोटेक्नोलॉजी या प्रशासकीय विभागांना रुपये १ लाखाचे अनुदान देऊन सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार या विभागांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

गुणवंत अधिकारी/कर्मचारी पुरस्काराचे मानकरीः

स्थापना दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपकुलसचिव निळकंठ तळवडेकर, सहाय्यक कुलसचिव चेतन कमलल्लू, सिस्टिम ऑपरेशन ऑफिसर प्रविण म्हात्रे, उपलेखापाल प्रकाश राऊळ, मुख्य लिपिक गणेश माने, सहायक लेखापाल तेजस कदम, कनिष्ठ ग्रंथालय सहायक सुचिता प्रविण सावे, वरिष्ठ लिपिक भागवत भोसले, भावना ठाकूर, वरिष्ठ लिपिक, मंजिरी चव्हाण, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक योगेश राऊत, दप्तरी अरविंद शिरगांवकर, गणेश लाखण, शिपाई संदिप घाग आणि नंदा बडेला यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह आणि पारितोषिक देऊन सन्मानीत करण्यात आले. दिपाली ठाकूर, मुख्य लिपिक आणि अर्जुन रांबाडे, पहारेकरी यांना लक्ष्मीबाई देशमुख पुरस्काराने गौरविण्यात आले.