ट्रॅक्टरखाली पडून मजुराचा मृत्यू

0
15

धानोरा,दि.31ः-रस्ता बांधकामासाठी गिट्टी घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरवरून मजुराचा तोल जाऊन खाली पडलेल्या मजुराच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक जाऊन मजूर जागीच ठार झाल्याची घटना  २९ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास तालुका मुख्यालयापासून ७८ किमी अंतरावर छत्तीसगड सिमेवर पेंढरी-बोटेसूर मार्गावर घडली. कुलेश्‍वर निरमल देहारी (२७) रा. झाडापापडा असे मृतक मजुराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार पेंढरी उपविभागातील पोलिस मदत केंद्र पेंढरी अंतर्गत येत असलेल्या हद्दीत एका कंत्राटदाराचे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. याकामावर काल दुपारच्या सुमारास पेंढरीवरून गिट्टी भरून बोटेसुर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर घेऊन जात होता. या कामावर झाडापापडा येथील जवळपास १५ मजूर कामावर जातात. यामध्ये कुलेश्‍वर देहारी हासुद्धा होता. सर्व मजूर या गिट्टी भरलेल्या ट्रॅक्टरवर बसून जात होते. दरम्यान कुलेश्‍वर देहारी याचा तोल गेल्याने तो खाली पडला असता त्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे मागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे सदर ट्रॅक्टर आयसर कंपनीची असून दोन वर्षापूर्वी ही ट्रॅक्टर नक्षल्यांनी जाळली होती, अशी माहिती आहे. सदर ट्रॅक्टरला नंबर प्लेटसुद्धा नाही, अशा भंगार वाहनामुळे नाहक मजुरांचा बळी जात आहे. देहारी याचा मृतदेह शवविच्छेनसाठी धानोरा येथे आणण्यात आला. घटनेची तक्रार पेंढरी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पेंढरी पोलिस करीत आहेत.कुलेश्‍वर देहारी हा ३ वर्षापासून याच कंत्राटदाराकडे काम करीत होता. काम नसल्याने त्याला या ठिकाणी पाठविण्यात आल्याची माहिती आहे.