जि.प. सभापती निवडणुकीत भाजप-काँग्रेसचे प्रत्येकी दोन सभापती

0
7
काँग्रेसचे रमेश अंबुले शिक्षण व आरोग्य सभापती
काँग्रेसच्या लता दोनोडे महिला बालकल्याण सभापती
भाजपचे विश्वजीत डोंगरे समाजकल्याण सभापती
भाजपचा शैलजा सोनवने कृषी व पशुसंवर्धन सभापती
गोंदिया,दि.30-जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जुळलेली मैत्री भाजप व काँग्रेसने पुन्हा घट्ट केली. या निवडणुकीतही काँग्रेसने राष्ट्रवादीला बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी आपण सख्खे वैरी सख्खे भाऊ चा नारा देत जुनीच मैत्री कायम ठेवली आहे.सभागृहात २० सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादीला यावेळीही विरोधी बाकांवर बसून भाजप-काँग्रेसचा संसार बघावा लागणार आहे.53 सदस्य संख्या असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या एका सदस्याचे आज निधन झाल्याने सभापती निवडणुक प्रकियेत 52 सदस्यांनी सहभाग नोंदविला.त्यामध्ये काँगॅेस 15,भाजप 17 व राष्ट्रवादीच्या 20 सदस्यांचा समावेश होता.
जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या विषय समिती निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे व उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी काम पाहिले. विषय समितीच्या समाजकल्याण समिती सभापतिकरीता भाजपकडून विश्वजीत डोंगरे, राष्ट्रवादीकडून मनोज डोंगरे  यांनी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसने आपला उमेदवार न दिल्याने काँग्रेस-भाजप युती स्पष्ट बघावयास मिळाली. या निवडणुकीत भाजपच्या डोंगरे यांना ३१ तर राष्ट्रवादीचे डोंगरे यांना २० मते मिळाली. भाजपच्या डोंगरे यांना काँग्रेसचे जि.प.सदस्य दिपक पवार यांनी मतदान केले नाही. त्याचप्रमाणे महिला बालकल्याण विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेसकडून लता दोनोडे  व काँग्रेसच्या सरिता कापगते, राष्ट्रवादीकडून दुर्गा तिराले यांनी अर्ज दाखल केले होते. 
काँग्रेसच्या श्रीमती कापगते यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यांच्या अर्जावर अनुमोदक म्हणून राष्ट्रवादीचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांची स्वाक्षरी होती. यात भाजपने आपला उमेदवार रिंगणात उतरविला नाही. काँग्रेसच्या लता दोनोडे यांना ३२ व राष्ट्रवादीच्या दुर्गा तिराले यांना २० मते मिळाली. काँग्रेसच्या दोनोडे यांना भाजपच्या १७ सदस्यांनी मतदान केले. यानंतर उरलेल्या दोन विषय समितीकरीता झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून रमेश अंबुले यांनी तर भाजपकडून शैलजा सोनवाने यांनी अर्ज दाखल केला.
राष्ट्रवादीकडून किशोर तरोणे व राजेश भक्तवर्ती हे रिंगणात होते. रमेश अंबुले यांना ३२ व राष्ट्रवादीचे किशोर तरोणे २०, भाजपच्या शैलजा सोनवाने यांना ३२ तर राजेश भक्तवर्ती यांना २० मते पडली. काँग्रेसचे जि.प.सदस्य़ शेखर पटले यांचे निधन झाल्याने ५३ सदस्य संख्या असलेल्या जि.प.विषय समिती निवडणुकीत ५२ सदस्यांनी मतदान केले. मतदानापुर्वी आजच निधन झालेल्या सदस्यांला श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.परंतु आधी निवडणूक नंतर श्रद्धांजली अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्यान आधी निवडणूक घेण्यात आली.निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर श्रद्धांजली सभा घेण्यात आली.त्या सभेला राष्ट्रवादीचे सदस्य गैरहजर राहिल्याचे वृत्त समोर आले आहे.