विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी चोरी

0
9

नागपूर  दि. १९ :: माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुतण्याकडे चोरी झाली. चोरट्याने १ लाख १० हजार रुपये लंपास केले. चौकशीत वडेट्टीवारांकडे वाहनचालक म्हणून काम करणारा नोकरच चोर निघाला. सीताबर्डी पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
रामदासपेठेत माजी मंत्री वडेट्टीवारांचे ‘कमलाताई’ हे आलिशान निवासस्थान आहे. वडेट्टीवारांचे पुतणे शिव संजय वडेट्टीवार (वय २०) येथेच राहतात. त्यांची बहीण शिवानी वडेट्टीवार यांनी आपल्या रूमच्या लॉकरमध्ये काही दिवसांपूर्वी दोन लाख रुपये ठेवले होते. वडेट्टीवार यांच्याकडे कारचालक म्हणून काम करणारा आणि तेथेच सर्व्हंट कॉर्टरमध्ये राहणारा आरोपी राहुल गंगाधर ठाकरे (वय २६, रा. सोनपुरी, ता. उमरेड) याने २ लाखांमधील ७० हजार रुपये काढून नेले. १३ जूनला ही चोरी लक्षात आल्यानंतर शिव वडेट्टीवार यांनी राहुलला विचारणा केली. त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वडेट्टीवारांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार खराबे यांनी वडेट्टीवारांच्या निवासस्थानी चौकशी करून आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यापूर्वी देखील त्याने अनेकदा ५ हजार १० हजार अशी रक्कम चोरली होती. जशी गरज पडली तशी तो रक्कम चोरत होता. एकदम ७० हजार रुपये चोरल्यामुळे ते लक्षात आले. आतापावेतो एकूण १ लाख १० हजार रुपये चोरल्याचे त्याने कबूल केले. त्याला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.