Home गुन्हेवार्ता विवाहितेसह दोघींचा विनयभंग

विवाहितेसह दोघींचा विनयभंग

0

नागपूर,दि.30 : एका विवाहित महिलेसह दोघींचा दोन आरोपींनी वेगवेगळ्या प्रकारे विनयभंग केला. सोनेगाव आणि बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणात आरोपीने महिलेसह तिच्या पतीलाही जीवे मारण्याची धमकी दिली.
सोनेगाव पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी निखील देवीदास मेश्राम (वय २३) याने नेहमीच्या संपर्कातील महिलेने अबोला धरल्याने पाठलाग करून, तिला वारंवार फोन करून त्रास देणे सुरू केले. एवढेच नव्हे तर अश्लील शिवीगाळ करून तिला व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी निखील मनीषनगरात राहतो. याच भागात राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत (वय ३८) त्याची ओळखी होती. गेले अनेक दिवस ते संपर्कात होते. त्यामुळे महिला त्याला वेळोवेळी रोख रक्कमही देत होती. सुमारे एक ते दीड लाख रुपये त्याने तिच्याकडून घेतले होते. दरम्यान, या प्रकरणाची कुणकुण लागल्याने महिला सतर्क झाली. तिने आरोपीसोबत १ आॅक्टोबरपासून संपर्क तोडला. वारंवार संपर्क करूनही ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे आरोपी निखील चिडला. तो तिचा पाठलाग करू लागला. तिला वारंवार फोन करू लागला. ती बोलत नसल्याने त्याने तिला अश्लील शिवीगाळ सुरू केली. महिलेने त्याची समजूत काढली. तो ऐकत नसल्याचे पाहून त्याला पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला. आरोपीने तिला तू पोलिसांत तक्रार दिल्यास तुला आणि तुझ्या पतीला पेट्रोल टाकून जिवंत ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यामुळे महिलेने बुधवारी या प्रकरणाची तक्रार सोनेगाव ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून आरोपी निखील मेश्रामविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

बजाजनगरात युवतीचा हात पकडला
अशाच प्रकारे बजाजनगर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीजवळ आरोपी राजेश निमसडकर (वय २७, रा. वर्धा) याने एका युवतीचा (वय १७) हात पकडून विनयभंग केला. मंगळवारी दुपारी आणि नंतर बुधवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली. प्रेमभंग झाल्याने आरोपी राजेशने हे कृत्य केल्याचे समजते. दरम्यान, त्याच्याकडून पुढे धोका होऊ शकतो, हे लक्षात आल्याने युवतीने बजाजनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version