तीस लाखाची रोकड घेऊनफरार आरोपी जेरबंद

0
20
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नरेश तुप्तेवार
नांदेड,दि.28ः-शहरातील वजिराबाद परिसरातून 30 लाख रुपये रक्कमेसह गाडी पळविणाऱ्या या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून नगदी 23 लाख रुपये व सोन्याचा ऐवज व पाच मोबाईल असा एकूण 25 लाख 60 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील वजिराबाद परिसरातून 21 डिसेंबर 2018 रोजी राजेंद्र बन्सीलाल यादव व जय अंबिका जिनिंगचे व्यवस्थापक मध्यप्रदेश येथील सतीश पालीवाल नांदेड येथे आले होते. वजिराबाद येथील तरोडेकर मंगल कार्यालयासमोरुन कार चालक राजेंद्र यादव हा 30 लाखाच्या रक्कमेसह फरार झाल्याची माहिती सतीश पालीवाल यांनी जैन यांना दिली. या प्रकारानंतर जैन यांनी राजेंद्र यादव व सतीश पालवाल यांच्याविरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वजिराबाद पोलिसांनी या प्रकरणात सतीश पालीवाल यांना ताब्यात घेत त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली. दरम्यान रक्कम व गाडी घेवून पसार झालेला आरोपी सापडत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि. विनोद दिघोरे यांचे एक पथक आरोपी राजेंद्र यादव याचा शोध घेण्यासाठी मध्यप्रदेश येथे रवाना झाले. 27 जानेवारी रोजी सदरील आरोपी खरगोण जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील गोलवाडी येथे आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरी गेलेले इंडिगो चार चाकी वाहन, नगदी २३ लाख रुपये, एक सोन्याची अंगठी, एक सोन्याची चैन व पाच मोबाईल असा एकूण 25 लाख 60 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी राजेंद्र यादव यास वजिराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई करणाऱ्या या पथकाला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 25 हजार रुपये तर फिर्यादी जय अंबिका जिनिंगचे मालक जैन यांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.