36.9 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home गुन्हेवार्ता मुल्ला येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मुल्ला येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
540

देवरी,दि.28 – येथून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुल्ला येथे आज पहाटेच्या सुमारास एका 20 वर्षीय युवकाने आपल्या बेल्टच्या साहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (दि.28) रोजी घडली. दरम्यान, देवरी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मृताचे नाव किशोर शोभेलाल भलावी (वय 20) राहणार मुल्ला असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर हा काल गावात एका लग्न समारंभात गेला होता. तेथे त्याचे काही लोकांशी भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत किशोरवर चोरीचा आड घेत त्याला जबर मारहाण झाल्याची चर्चा गावात आहे. किशोर हा संवेदनशील आणि चांगल्या वर्तणुकीचा मुलगा असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. लग्न समारंभात त्याला मारहाण होत असताना त्याचे वडील शोभेलाल यांनी मध्यस्थी करून किशोरला घरी आणले होते. मात्र,नंतर तो घरी कोणालाही न सांगता बाहेर निघून गेला. काही लोकांच्या मते किशोर हा पूर्वी बेल्ट लावत नव्हता. कालच त्याने पहिल्यादा नवीन बेल्ट खरेदी करून लग्न समारंभात गेल्याची चर्चा आहे. मध्यरात्रीच्या सुमारास गावालगत असलेल्या शेतशिवारात किशोरने बेल्टच्या साहाय्याने झाडाला गळफास घेतला . सकाळी गावातील एका इसमाला तो मृतावस्थेत आढळून आल्यावर घटना उजेडात आली. किशोरने गळफास घेतला की कोणी त्याची हत्या तर केली नसावी, असा संभ्रम गावकऱ्यांना पडला असून गावात उलटसुलट चर्चांना पेव फुटला आहे. घटनेतील सत्य हे पोलिस तपासानंतरच बाहेर येईल.