
मुंबई विद्यापीठाचा १६५ वा वर्धापनदिन समारंभ
गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार
मुंबई, दि. १9 जुलै: उद्याचा समाज घडविणारी प्रयोगशाळा म्हणजे विद्यापीठे! विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत विद्यापीठाची भूमिका ही कालव्याच्या स्वरूपात असून प्रंचड साठलेल्या उर्जेला विधायक वाट दाखवून नंदनवन करण्याची भूमिका ही विद्यापीठांची असावी असे मत लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाच्या १६५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ते पुष्प गुंफत होते. ‘विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत विद्यापीठांचे स्थान’ या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांच्यासह विविध प्राधिकरणातील सदस्य उपस्थित होते. पुढे ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये एका त्रिमितीय दृष्टिकोनाची गरज आहे. नविन सहस्त्रकात बदलेल्या तंत्रज्ञानाचा स्विकार करण्याची आपली तयारी, नविन शैक्षणिक धोरणाची विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास आणि कल्याणासाठी अंमलबजावणी आणि कोव्हिड काळानंतर बदललेली समाजव्यवस्था, जीवनाकडे बघण्याची दृष्टी याचा समग्र विचार करून विद्यापीठाना पावले टाकावी लागतील असे त्यांनी सांगितले. शिक्षणाचा मुळ उद्देश्य हा आत्म्याची उन्नती आणि व्यक्तिमत्वाचा विकास यासाठी अभिप्रेत असून त्यादृष्टिनेही विद्यापीठांची भूमिका महत्वाची ठरते. मोठे परिघ असलेल्या विद्यापीठांसमोर प्रादेशिक आणि सामाजिक असमतोल लक्षात घेऊन विद्यादान करण्याचे मोठे आवाहन असते त्याचाही सर्वंकष विचार होणे गरजेचेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठांनी व्यवसायाभिमूख शिक्षण पद्धतीचा अवलंब करून शिक्षणातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावही अधिक भर द्यावा त्याचबरोबर सर्वसमावेशक विद्यार्थ्यांना प्रेरक आणि पुरक ठरेल अशी वाटचाल विद्यापीठांनी करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर म्हणाले की, मुंबई विद्यापीठाने ज्ञानदानाच्या समृद्ध आणि उज्वल परंपरेत उत्तरोत्तर प्रगती केली आहे. मुंबई विद्यापीठाला लाभलेला ऐतिहासिक वारसा त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असून सर्वांच्या प्रयत्नातून हा आलेख असाच उंचावत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षभरात विद्यापीठाने अनेक नविन शैक्षणिक उपक्रम सुरु केले असून ज्यामध्ये युनिवर्सल ह्युमन वॅल्यू कक्षाची स्थापना, पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमांची रचना, स्कूल संकल्पना, राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने केलेली उल्लेखनिय कामगिरी यासह विविध उपक्रमांची माहिती प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी अहवाल वाचनात दिली.
मुंबई विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये संजय अंबाडे, संदिप पंडित, जयदेव कांदळगावकर, नंदकुमार चिले, प्रदीप लोटणकर, सुमेधा भिसे, हर्षद सामंत, केतन कान्हेरे, संजीवनी कारेकर, वर्षा देवधर, राजेश श्रीखंडे, उमेश सावंत, राजेश भोपी, दिपक हमक, आणि धनाजी गायकवाड यांचा समावेश आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘जितेंगे हम’ या गाण्याचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीतिन आरेकर यांनी केले.





