मुंबई, दि. २५ मे: संसदीय कार्य मंत्रालय नवी दिल्ली आणि विद्यार्थी विकास विभाग मुंबई विद्यापीठ यांच्या मार्फत मुंबई विद्यापीठात १६ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पश्चिम विभाग स्तरावरील आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील निवडक ६० विद्यार्थी सहभागी झाले होते. २३ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी संसदीय कार्य मंत्रालयाच्या नियमानुसार परीक्षक म्हणून खा. गोपाळ शेट्टी, खा. उन्मेश पाटील आणि डॉ. तरुण अरोरा, अधिष्ठाता, स्कूल ऑफ लीगल स्टडीज्, केंद्रीय विद्यापीठ पंजाब यांनी काम पाहिले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या स्पर्धेतील ६ विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अनुष्का मोरे, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक नूरसभा मुन्शी, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आदित्य एस यांना बहाल करण्यात आले तर वैश्नवी सिंह, गायत्री गोखले व अजय साहू यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खा. गोपाळ शेट्टी म्हणाले की, विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना भारतीय संसदीय लोकशाहीची ओळख व्हावी यासाठी युवा संसद हे प्रभावी माध्यम असून लोकशाही मजबूत करणारा हा एक अत्यंत स्तूत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना खा. उन्मेश पाटील म्हणाले की, युवा संसद या प्रभावी माध्यमाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण, उत्कंठावर्धक सादरीकरण हे आदर्श संसदीय कामकाजाचे उत्तम प्रतिरुप असून यामुळे विद्यार्थ्यांमधील वकृत्व गुणांना मोठा वाव मिळत असून आपण स्वत: युवा संसदेच्या स्पर्धेत सहभाग घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले. संसदीय लोकशाही प्रणालीमधील कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी शपथ, श्रद्धांजली, चर्चा, प्रश्नोत्तराचा तास, लक्षवेध, संसदीय कार्यपद्धत समजून घेण्यासाठी युवा संसद स्पर्धा अतिशय अभिनव उपक्रम असल्याचे प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच असा अर्थपूर्ण आणि लोकशाही मजबूत करणारा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी संसदीय कार्य मंत्रालयाचे आभार मानले. डॉ. तरुण अरोरा यांनी युवा संसद स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संसदीय कार्यप्रणालीची ओळख व्हावी, त्यांच्यातील वक्तृत्व व नेतृत्व गुणांना वाव मिळावा यासाठी संसदीय कार्य मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्फत दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.