आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापनेत ग्रामविकास विभागाच्या पत्राला ठेंगा

0
45

अवघड क्षेत्र देण्याएैवजी दिली सर्वसाधारण क्षेत्रात पदस्थापना

गोंदिया,दि.30ः आंतरजिल्हा बदलीने गोंदिया जिल्हा परिषदेत आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देतांना जिल्हा अंतर्गत बदलीसाठी बदलीपात्र असलेल्या शिक्षकांवर अन्याय करण्यात आला आहे.तर दुसरीकडे ग्रामविकास विभागाच्या पत्राला केराची टोपली दाखवत जिल्हा परिषद प्रशासनाने अवघड क्षेत्रात पदस्थापना न देता सर्वसाधारण क्षेत्रात पदस्थापना दिल्याने शिक्षण विभागातील प्रकार चव्हाट्य़ावर आलेला आहे.
आंतरजिल्हा बदलीने गोंदिया जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांची कार्यशाळा 28 सप्टेंबरला घेण्यात आली.यात त्यांना सर्वसाधारण क्षेत्रातील अगदी मोक्याच्या ठिकाणी नेमणूक देण्यात आली.नेमणूक देताना 7 एप्रिल2021 च्या शासन निर्णयाचे सरळसरळ उल्लंघन करण्यात आले आहे. त्या शासन निर्णयात आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळा देण्यात याव्यात अशी स्पष्ट तरतूद असताना त्यांना सर्वसाधारण क्षेत्रातील मोक्याच्या जागा कोणत्या नियमांतर्गत देण्यात आल्या? अशा प्रश्न उपस्थित झालेला आहे.तर यासाठी काही आर्थिक व्यवहार तर झाला नाही ना अशा चर्चांना व शंका कुशंकाना पेव फुटले आहे. तसेच 19/09/2022 ला ग्रामविकास विभागाच्या एका पत्रानुसार यांना 31 ऑगस्ट 2022 नंतर पदस्थपना न देता यांच समायोजन करून जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर यांना पदस्थपना द्यावे अशा सूचना असताना कार्यशाळा आयोजित करून पदस्थपना देण्यात आली. या संदर्भात काही अपवाद वगळता आपल्या शिक्षक संघटनेतील शिक्षक नेत्यांची भूमिका गोलमाल व संशयास्पद बघावयास मिळाली.या संदर्भात त्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन या निर्णयाला विरोध करावा असा सूर शिक्षकामधून उठू लागला असून त्याचा परिणाम शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीवर पडणार असल्याचेही बोलले जाते.आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात पदस्थपना दिल्याने जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत बदली पात्र शिक्षकांवर अन्याय झाला असून त्यांच्यावर विस्थापित होऊन अवघड क्षेत्रात जाण्याची वेळ शिक्षण विभागातील अधिकारी,पदाधिकारी व शिक्षक संघटनामुळे येण्याची वेळ आली आहे.