
मुंबई, दि. ११ नोव्हेंबर: महाराष्ट्रातील अनुदानित महाविद्यालयांची नॅक मूल्यांकनाची स्थिती अधिक चांगली आहे. अनेक अनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केलेले आहे, त्यांना त्याचा वेळोवेळी फायदाही होतो. मात्र विना अनुदानित महाविद्यालये मूल्यांकनासाठी निरुत्साही दिसून येतात. अशा सर्व महाविद्यालयांनी गुणवत्ता वाढीसाठी मूल्यांकन करून घेणे अनिवार्य असून या महाविद्यालयांनी लवकरात लवकर नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केली. ज्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करण्यासाठी अडचणी येत असतील, त्यांना काही प्रश्न किंवा शंका असतील अशा सर्वांना सर्वोतोपरी सहाय्य केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते आज मुंबई विद्यापीठात ‘अॅक्रेडिटेशन: वे अहेड’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. मुंबई विद्यापीठ, रुसा महाराष्ट्र आणि युजीसी एचआरडीसीच्या सयुंक्त विद्यमाने कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील श्रेयांकन नसलेल्या महाविद्यालयांना मूल्यांकन आणि श्रेयांकनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नॅकचे अध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन, प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग श्री. विकासचंद्र रस्तोगी, रुसाचे राज्य प्रकल्प संचालक, तथा एमएसएफडीएचे कार्यकारी संचालक डॉ. निपून विनायक (भा.प्र.से.), मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह राज्यातील विविध महाविद्यालयाचे व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, प्राचार्य यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना पुढे ते म्हणाले की, ज्या महाविद्यालयांचे मूल्यांकन झालेले नाही अशा महाविद्यालयांना मूल्यांकनासाठी लागणारे सहाय्य राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर करता येईल किंवा जिल्हा नियोजनाकडून काही मदत करता येईल का ते सुद्धा तपासून घेता येईल असेही त्यांनी सांगितले. राज्यात २,०८८ प्राध्यापक भरतीची प्रक्रीया सुरु करण्यात आली असून भरती प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी रोस्टरप्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी केली. रोजगाराभिमूख आणि कौशल्याधारीत अभ्याक्रमांची गरज अधोरेखित करताना त्यांनी बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम राबविण्यावर भर दिला जावा असेही सूचविले. शिक्षण हे जीवनपयोगी आणि समाजपयोगी करावे त्यासाठी मूल्यांकन प्रकीयेचे महत्व अधोरेखित होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेच्या बीज भाषणात ‘इव्हॉल्वींग रोल ऑफ अॅक्रेडिटेशन- एम्प्लॉयबिलीटी व्हर्सेस सिटीझनरी’ या विषयावर मार्गदर्शन करताना नॅकचे अध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन म्हणाले की, मूल्यांकन हे गुणवत्ता वाढविण्यासाठी असते. भविष्यात मूल्यांकनाच्या पद्धतीत खूप मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. बायनरी श्रेयांकन, स्वतंत्र विषयांसाठीचे श्रेयांकन, मूल्यमापनाची पद्धती याबरोबरच नवीन मॅन्युअल असे अनेक बदल पाहायला मिळणार असून मूल्यांकनाची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. विकासचंद्र रस्तोगी यांनी मूल्यांकन आणि श्रेयांकनासाठीची आग्रही भूमिका विशद करताना ग्रॉस एनरॉलमेंट रेसो वाढविण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने बदल करावे लागणार असल्याचे सांगितले.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के म्हणाले की, नॅक मूल्यांकनामध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा २० टक्के एवढा आहे. ज्या महाविद्यालयांचे मूल्यांकन झालेले नाही अशा महाविद्यालयांना प्रोत्साहन देऊन त्यांना पाठबळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
परिषदेच्या पहिल्या सत्रात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे माजी कुलगुरू प्रा. आर. एस. माळी यांनी ‘सध्याची नॅक श्रेयांकनाची पद्धत आणि आयक्यूएसीची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात रुसाचे राज्य प्रकल्प संचालक, तथा एमएसएफडीएचे कार्यकारी संचालक डॉ. निपून विनायक (भा.प्र.से.) यांनी ‘एमएसएफडीए ओव्हरव्यू अँड एक्टीवीटीज्’ या विषयावर प्रकाश टाकला. तिसऱ्या सत्रात इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एज्यूकेशन अँड रिसर्च, पुणे येथील निवृत्त प्राध्यापक के. पी. मोहनन यांचे ‘अक्वायरिंग हायर ऑर्डर कॉग्नीशन’ या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. तर चौथ्या सत्रात महाविद्यालयांच्या मूल्यांकन आणि श्रेयांकनातील यशोगाथा यावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या एक दिवसीय परिषदेत राज्यातील २० विद्यापीठातील एकूण १९३ महाविद्यालयांनी नोंदणी केली होती.