मॉरिशसमधील विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठात सांस्कृतिक कलाविष्कार

0
20

मुंबई, दि.19 नोव्हेंबर:  मॉरिशस येथील मराठी सांस्कृतिक ट्रस्ट आणि मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमाअंतर्गत आज मुंबई विद्यापीठात मॉरिशस येथील विद्यार्थ्यानी त्यांच्या कला गुणांचा अविष्कार सादर केला. भारतीय विशेषत: महाराष्ट्रीयन संस्कृतीशी घट्ट नाळ जोडलेल्या मॉरिशस येथील विद्यार्थ्यानी विविध दर्जेदार कला सादर केल्या. यामध्ये गणपतीनृत्य, कोळीनृत्य, लावणी, गोंधळ आणि एकल नृत्य सादरीकरण करुन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमूग्ध केले.

मॉरिशस मराठी सांस्कृतिक ट्रस्टचे अध्यक्ष अर्जून पुतलाजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमास  नितीन बापु, अध्यक्ष मराठी भाषिक संघ, आणि उपाध्यक्षा प्रीशिला इटू यांची उपस्थिती लाभली होती. या समूहाला नृत्य दिग्दर्शनासाठी जयश्री बापु आणि रोचना देसाई यांचे सहकार्य लाभले. मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी उपस्थित समुहाचे अभिनंदन करुन त्यांना त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन विद्यार्थी विकास विभागामार्फत करण्यात आले होते.