मागावर्गीय विद्यार्थ्यांना मंडणगड पॅटर्ननुसार मिळणार जात पडताळणी प्रमाणपत्र

0
13

जिल्हा जात पडताळणी समितीची विशेष मोहिम

संबंधित महाविद्यालयातच प्रस्ताव सादर करावे

  गोंदिया दि. 22: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागामार्फत सन 2022-23 या शैक्षणीक सत्रात मंडणगड पॅटर्न नुसार गोंदिया जिल्ह्यातील इयत्ता इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तसेच तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्याच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांचे वतीने विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

          इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फॉर्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमास आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी तसेच सदर अभ्यासक्रमाची  शिक्षण  फीची  प्रतीपूर्वी करण्यासाठी  जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. तथापी इयत्ता 11 वी व 12 विज्ञान शाखेतील विद्यार्थी वेळेत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव समितीकडे दाखल करीत नाहीत, पर्यायाने अशा विद्यार्थ्यांना वरील सवलतीचा लाभ मिळत नाही, सदर अडचण विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मध्ये इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तसेच तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येत आहे.

त्याकरिता संबधीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज  bartievalidity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरुन सदर अर्जाची हार्ड कॉपी संबंधीत महाविद्यालयात दाखल करावी व संबंधीत महाविद्यालयांनी असे अर्ज 31 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांचेकडे सादर करावे. 31 डिसेंबर 2022 नंतर प्राप्त होणारे अर्ज स्विकारले जाणार  नाहीत, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. गोंदिया जिल्ह्यातील काही महाविद्यालयामध्ये समिती मार्फत शिबीरे आयोजित करण्यात आलेले असून त्याच ठिकाणी संबंधीत विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारुन त्यांना त्यांचे परिपुर्ण कागदपत्रानुसार व पात्रतेनुसार तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येत आहे. अशी माहिती उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोदिया राजेश शा. पांडे यांनी  दिली आहे.